BJP l 2023-24 या आर्थिक वर्षात भारतीय जनता पक्षाने (BJP) सर्वाधिक उत्पन्न मिळवत राष्ट्रीय पक्षांमध्ये वर्चस्व गाजवले आहे. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या (Association of Democratic Reforms – ADR) अहवालानुसार, भाजपने तब्बल 4,340.47 कोटी रुपये उत्पन्न जाहीर केले असून, हे राष्ट्रीय पक्षांच्या एकूण उत्पन्नाच्या 74.57 टक्के आहे. दुसरीकडे, काँग्रेसने (Congress) 1,225 कोटी रुपयांचे उत्पन्न नोंदवले असून त्यात मागील वर्षीच्या तुलनेत 171 टक्के वाढ झाली आहे.
पक्षांचे उत्पन्न आणि खर्चाचा तुलनात्मक आढावा :
ADR अहवालात सांगितल्यानुसार, भाजपने 4,340 कोटी रुपये उत्पन्न केले असून, त्यातील फक्त 2,211 कोटी रुपये खर्च केले आहेत. म्हणजेच त्यांनी मिळवलेल्या उत्पन्नाच्या केवळ 49.04 टक्केच खर्च केला आहे. काँग्रेसने 1,225 कोटी रुपयांपैकी 1,025 कोटी रुपये खर्च केले, जे त्याच्या एकूण उत्पन्नाच्या 83.69 टक्के आहे. इतर पक्षांच्या उत्पन्न आणि खर्चाच्या आकडेवारीनुसार, माकपने (Marxist Communist Party) 167 कोटी रुपयांच्या तुलनेत 127 कोटी रुपये खर्च केले आहेत, तर बसपाने (BSP) 64 कोटी उत्पन्नातून 43 कोटींचा खर्च केला आहे. ‘आप’ (AAP) पक्ष मात्र तोट्यात असून, त्यांनी 22 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवून 34 कोटी रुपये खर्च केले आहेत.
BJP l निवडणूक रोख्यांमधून मिळाले कोट्यवधी रुपये :
ADR च्या अहवालानुसार, 2023-24 या आर्थिक वर्षात स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) जाहीर केलेल्या माहितीप्रमाणे, विविध राजकीय पक्षांनी एकूण 4,507.56 कोटी रुपयांचे निवडणूक रोखे वटवले आहेत. यातील 55.99 टक्के वाटा राष्ट्रीय पक्षांचा होता.
पक्षांना सर्वाधिक निधी कुठून मिळाला? :
भाजपच्या उत्पन्नातील मोठा हिस्सा स्वेच्छेने दिलेल्या देणग्यांमधून आला असून, त्यांनी 3,967 कोटी रुपये देणगीद्वारे जमा केले आहेत, जे त्यांच्या एकूण उत्पन्नाच्या 91 टक्के आहे. काँग्रेसला 1,129 कोटी रुपयांचे उत्पन्न अनुदान व देणग्यांमधून मिळाले, तर माकपला 74 कोटींचे उत्पन्न अनुदान आणि देणग्यांद्वारे मिळाले. बसपाच्या उत्पन्नातील 41 टक्के हिस्सा सदस्यत्व शुल्कातून तर ‘आप’च्या उत्पन्नातील 97 टक्के हिस्सा अनुदानाद्वारे आला आहे.
राष्ट्रीय पक्षांचा खर्च मुख्यतः निवडणूक प्रचारावर :
पक्षांचे सर्वाधिक खर्च प्रचारावर झाले आहेत. भाजपने 1,754 कोटी रुपये निवडणूक प्रचारावर खर्च केले, तर काँग्रेसने 619 कोटी रुपये खर्च केले. माकपने 56 कोटी रुपये प्रशासकीय खर्चावर, बसपाने 23 कोटी रुपये निवडणूक प्रचारावर आणि ‘आप’ने 19 कोटी रुपये प्रचारासाठी खर्च केले.
काँग्रेसच्या उत्पन्नात मोठी वाढ, ‘आप’ आणि बसपाला तोटा :
2022-23 आणि 2023-24 या आर्थिक वर्षांच्या तुलनेत भाजपच्या उत्पन्नात 83.85 टक्के म्हणजेच 1,979 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. काँग्रेसच्या उत्पन्नात 171 टक्क्यांनी वाढ झाली असून, ते 452 कोटींवरून 1,225 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. माकपच्या उत्पन्नात 18 टक्के वाढ झाली आहे, तर ‘आप’ आणि बसपाच्या उत्पन्नात अनुक्रमे 24 आणि 23 टक्के घट झाली आहे.






