महायुतीचं ठरलं! संभाजीनगर काबीज करण्यासाठी भाजप-शिवसेना सज्ज; जागावाटपाचं गणित अखेर सुटलं!

On: December 27, 2025 12:17 PM
Chhatrapati Sambhajinagar
---Advertisement---

Chhatrapati Sambhajinagar | मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी अखेर भाजप आणि शिंदे शिवसेनेची युती निश्चित झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या बैठका, चर्चा आणि रस्सीखेचीनंतर दोन्ही पक्षांमध्ये दिलजमाई झाली आहे. पाच बैठका निष्फळ ठरल्यानंतरही युती व्हावी यासाठी दोन्ही पक्ष आग्रही होते. अखेर जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याने महायुतीची घोषणा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (Chhatrapati Sambhajinagar Municipal Election 2026)

गेल्या दोन दशकांपासून छत्रपती संभाजीनगर महापालिकेवर भाजप-शिवसेनेचा भगवा फडकत आहे. मागील निवडणुकीत एकत्रित शिवसेना आणि भाजपमध्ये अंतर्गत वाद दिसून आले होते. त्याचाच फायदा घेत एमआयएमने जोरदार मुसंडी मारली होती. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांत एमआयएमचा प्रभाव दिसून आला होता. मात्र यावेळी भाजप आणि शिंदे शिवसेनेने एकत्र येत महापालिका निवडणुकीत पुन्हा ताकद दाखवण्याचा निर्णय घेतला आहे.

कुणाला मिळाल्या किती जागा? :

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या एकूण 115 जागांपैकी 87 जागांवर भाजप-शिवसेना युती थेट निवडणूक लढवणार आहे. यामध्ये भाजप 45 जागांवर, तर शिवसेना 43 जागांवर उमेदवार देणार आहे. उर्वरित जागांवर मुस्लिम बहुल मतदारसंघ असल्याने त्या जागांबाबत आज पुढील चर्चा करण्यात येणार आहे.

या जागांसाठी भाजप आणि शिवसेनेची संयुक्त बैठक सुरू असून, इतर पक्ष व अपक्ष उमेदवारांशीही जागावाटपाबाबत चर्चा केली जात आहे. त्यामुळे कोणत्या प्रभागात कोणत्या पक्षाचा उमेदवार असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Chhatrapati Sambhajinagar | अंतिम फॉर्म्युल्यासाठी महत्त्वाची बैठक :

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेना नेत्यांची खासदार डॉ. भागवत कराड यांच्या निवासस्थानी बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला निश्चित केला जाणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांनी रात्रीच युती होणार असल्याचे स्पष्ट केले होते. (Chhatrapati Sambhajinagar Municipal Election 2026)

आज स्थानिक नेत्यांची बैठक होऊन त्यानंतर अधिकृत घोषणा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले होते. या बैठकीला पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे, दोन्ही पक्षांचे जिल्हाध्यक्ष आणि डॉ. भागवत कराड उपस्थित आहेत.

बंडोबांना थंड करण्याचे मोठे आव्हान :

भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांकडे इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी असल्याने नेतृत्वासमोर बंडोबांना थंड करण्याचे मोठे आव्हान आहे. कोणता प्रभाग सोडायचा, कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये, ही आमची भूमिका असल्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले होते.

इच्छुक जास्त आणि जागा कमी असल्याने कोणत्या जागेवर कोण लढणार, यावर सखोल चर्चा आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. अंतिम चर्चा पूर्ण झाल्यानंतर भाजप-शिवसेना युतीची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

News Title: BJP-Shiv Sena Finalise Alliance for Chhatrapati Sambhajinagar Municipal Elections, Seat Sharing Formula Decided

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now