खळबळजनक! महापौर निवडीपूर्वीच ‘बंडखोरी’चे संकेत? १५ नगरसेवक गायब झाल्याने नेत्यांचे धाबे दणाणले

On: January 18, 2026 7:24 PM
Mayor Election News
---Advertisement---

Mayor Election News | महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यभरात महापौरपदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेक महापालिकांमध्ये स्पष्ट बहुमत नसल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला असून, संभाव्य घोडेबाजार टाळण्यासाठी पक्षांकडून नगरसेवकांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात असल्याचे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता मुंबईसह चंद्रपुरात मोठ्या राजकीय हालचाली घडताना दिसत आहेत.

राज्यातील 29 महापालिकांपैकी बहुतेक ठिकाणी भाजप आणि महायुतीला यश मिळाले असले तरी काही महापालिकांमध्ये महापौरपदासाठी रस्सीखेच सुरू आहे. विशेषतः मुंबई महानगरपालिकेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी स्पष्ट बहुमत नसल्यामुळे सत्ता स्थापनेसाठी शिवसेना शिंदे गटावर अवलंबून राहावे लागणार आहे. यामुळे सत्तासमीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुंबईत महापौरपदासाठी जोरदार हालचाली :

मुंबईत भाजपला सर्वाधिक 89 जागा मिळाल्या असल्या तरी महापौरपदासाठी बहुमताचा आकडा गाठता न आल्यामुळे युतीतील चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाने आपल्या सर्व नगरसेवकांना संभाव्य घोडेबाजार टाळण्यासाठी हॉटेलमध्ये हलवल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, शिंदे गटाने भाजपकडे अडीच वर्ष महापौरपदाची मागणी केल्याची चर्चा आहे, मात्र भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा दावा फेटाळून लावला आहे.

मुंबईतील या राजकीय हालचालींमुळे महापौरपदाची निवड अधिकच रंगतदार होत चालली असून, पुढील काही दिवसांत या घडामोडींवर राज्याचे लक्ष केंद्रित राहणार आहे. सत्तास्थापनेसाठी कोणता फॉर्म्युला ठरतो, याकडे सर्वच पक्षांचे लक्ष लागले आहे.

Mayor Election News | चंद्रपुरात काँग्रेसमधील अंतर्गत कुरघोडी :

दरम्यान, चंद्रपुर महानगरपालिकेत काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. विजय वडेट्टीवार यांच्या गटातील तब्बल 15 नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे, प्रतिभा धानोरकर गटाकडून देखील 12 नगरसेवकांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आल्याचे कळते. त्यामुळे चंद्रपुरातील (Chandrapur Politics) महापौरपदाच्या निवडीत मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. (Mayor Election News)

येणाऱ्या दोन दिवसांत महापौरपदासाठी आरक्षण जाहीर होण्याची शक्यता असल्यामुळे चंद्रपुरात कोण महापौर होणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अंतर्गत गटबाजी, नगरसेवकांची हालचाल आणि सत्ता स्थापनेसाठी सुरू असलेली धावपळ पाहता, येत्या काही तासांत आणखी मोठ्या घडामोडी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

News Title: Big Twist in Mayor Election as 15 Corporators Shifted to Unknown Location

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now