Ajit Pawar | राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी मोठी बातमी समोर आली आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वी राज्यातील महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना मोठा धक्का बसल्याचे चित्र आहे. नाशिक सत्र न्यायालयाने गृहनिर्माण घोटाळा प्रकरणात मंत्री आणि अजित पवार गटाचे महत्त्वाचे नेते माणिकराव कोकाटे (Manikrao kokate) यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
या आदेशामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच अजित पवार गट अडचणीत आला आहे. कोकाटे यांनी शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सध्या तरी हायकोर्टाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. तातडीची सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिल्याने आता या प्रकरणावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या अटकेची शक्यता नाकारता येत नाही.
माणिकराव कोकाटे अडचणीत, मंत्रिपदावर टांगती तलवार :
नाशिक पोलिसांकडे माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या अटक वॉरंटची प्रत प्राप्त झाली असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे. अटक वॉरंट जारी झाल्यामुळे कोकाटे यांचे मंत्रिपद आणि आमदारकी धोक्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे ते सध्या मोठ्या अडचणीत सापडले असून राजकीय भविष्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
ऐन महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. निवडणूक रणधुमाळी सुरू होत असताना पक्षातील महत्त्वाच्या नेत्यावर अटक वॉरंट निघणे, हे पक्षासाठी प्रतिकूल ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Ajit Pawar | निवडणूक जबाबदारीवर परिणाम होणार? :
राष्ट्रवादी अजित पवार गटात माणिकराव कोकाटे यांच्याकडे आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली होती. नाशिक, जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांतील निवडणूक नियोजनाची मोठी धुरा त्यांच्या खांद्यावर होती. याशिवाय ते नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री असून इतर तीन जिल्ह्यांचे संपर्कमंत्री म्हणूनही त्यांची भूमिका महत्त्वाची आहे.
प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी ऑक्टोबर महिन्यात कोकाटे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली होती. मात्र, आता त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी झाल्याने या सर्व जबाबदाऱ्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या माणिकराव कोकाटे रुग्णालयात असल्याची माहिती समोर येत असून पुढील घडामोडींवर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. येत्या काळात या प्रकरणाचा थेट परिणाम महापालिका निवडणुकीच्या राजकारणावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.






