Dharmendra Prayer Meet | बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतल्यानंतर देओल कुटुंबियांनी अत्यंत गुप्तता पाळत त्यांच्या अंत्यसंस्कारांची प्रक्रिया पार पाडली. धर्मेंद्र यांचे अखेरचे दर्शन चाहत्यांना मिळाले नाही, तसेच मीडियालाही या संपूर्ण प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आले. यामुळे अनेक चाहत्यांमध्ये नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. (Dharmendra Prayer Meet)
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर मुंबईत प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. संपूर्ण देओल कुटुंबियांची उपस्थिती होती आणि श्रद्धांजली अर्पण करताना भजनाचे आयोजनही करण्यात आले होते. मात्र, या प्रार्थना सभेत धर्मेंद्र यांच्या पत्नी हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन्ही मुली उपस्थित नव्हत्या, ही बाब विशेष चर्चेचा विषय ठरली.
हेमा मालिनी अनुपस्थित राहिल्याने चर्चांना उधाण :
मुंबईतील प्रार्थना सभेला हेमा मालिनी अनुपस्थित राहिल्यानंतर सोशल मीडियावर विविध तर्कवितर्क लढवले जाऊ लागले. मात्र, हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या स्मरणार्थ दिल्ली आणि मथुरेत स्वतंत्र प्रार्थना सभा आयोजित केल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांनी जाणीवपूर्वक मुंबईतील सभेला हजेरी न लावल्याचे बोलले जात आहे.
या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध चित्रपटगृह मालक मनोज देसाई यांनी धर्मेंद्र यांच्या मुंबईतील प्रार्थना सभेबाबत मोठे विधान केले आहे. त्यांनी सांगितले की, श्रद्धांजली सभेसाठी हजारो लोक उपस्थित होते. सनी देओल यांना भेटण्यासाठी त्यांना बराच वेळ थांबावे लागले. गाड्यांची मोठी रांग लागली होती आणि जगभरातून लोक या सभेला पोहोचले होते.
Dharmendra Prayer Meet | मनोज देसाईंचं थेट विधान, वातावरणाचा उलगडा :
मनोज देसाई (Manoj Desai) यांनी सांगितले की, इतकी प्रचंड गर्दी त्यांनी कधीही कोणत्याही प्रार्थना सभेत पाहिली नव्हती. तब्बल 45 मिनिटे ते गाडीत अडकून पडले होते. त्यांच्या गाडीच्या पुढे आणि मागे मोठ्या गाड्या होत्या, त्यामुळे हालचालच होऊ शकत नव्हती. त्यांनी सनी देओल यांना भेटून इतकी मोठी गर्दी जमल्याची माहिती दिली.
पुढे बोलताना मनोज देसाई यांनी थेट विधान करत म्हटले की, “हेमा मालिनी (Hema Malini) आल्या नाहीत याचे मला काहीही आश्चर्य वाटले नाही. कोणताही वाद निर्माण होण्यापूर्वीच त्या दूर राहिल्या. त्यांनी आधीच त्यांच्यासाठी स्वतंत्र प्रार्थना सभा आयोजित केली होती. त्यामुळे त्या मुंबईतील सभेला आल्या नाहीत, हेच बरे झाले.” त्यांच्या या विधानामुळे ही बाब पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.






