Dhananjay Munde | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या राजकीय घडामोडींनंतर आता मंत्रीपदासोबतच सरकारी निवासस्थानांमध्येही मोठे बदल होऊ लागले आहेत. अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा दिल्यानंतर त्यांचा सातपुडा बंगला आता छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यानुसार मुंडेंना हा बंगला १५ दिवसांच्या आत रिकामा करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.
बंगला खाली करण्यासाठी १५ दिवसांची मुदत
धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यांहून अधिक काळ उलटून गेला तरीही सातपुडा बंगला त्यांच्या ताब्यातच होता. आता राज्य सरकारने नोटीसी काढून हा बंगला भुजबळ यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सध्या या बंगल्याचे मुख्य गेट बंद ठेवण्यात आले असून, पोलिसांना कुणालाही आत न सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, २० मे रोजी छगन भुजबळ यांनी राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांना पुन्हा एकदा अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. ही जबाबदारी त्यांच्याकडे याआधीही दोनदा होती. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर हे खाते रिक्त झालं होतं, त्याच जागी आता भुजबळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Dhananjay Munde | कोणाला कोणता बंगला मिळाला? :
या पार्श्वभूमीवर, मंत्री आणि त्यांच्या निवासस्थानांची यादीही चर्चेत आली आहे. राम शिंदे यांचं निवासस्थान ‘सभापती’, राहुल नावेकर यांचं ‘ज्ञानेश्वरी’, तर चंद्रकांतदादा पाटील यांचा ‘सिंहगड’ आहे. अशा प्रकारे प्रत्येक मंत्र्याला एक विशिष्ट सरकारी निवासस्थान देण्यात आलेलं आहे. सातपुडा बंगला पूर्वी धनंजय मुंडेंकडे होता, तर आता छगन भुजबळांचा तिथे लवकरच गृहप्रवेश होणार आहे.
संपूर्ण राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर, हे बदल केवळ पदांपुरते मर्यादित नसून त्यांच्या सोयी-सुविधांवरही मोठा परिणाम करत आहेत. त्यामुळे आता पुढील काही दिवसांत सातपुडा बंगल्यावर भुजबळांचा ताबा आणि नव्या जबाबदारीसह त्यांची वाटचाल कशी होते, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.






