Bharat Gogawale | महाड नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या मारहाण प्रकरणामुळे मंत्री भरत गोगावले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या प्रकरणात त्यांचा मुलगा विकास गोगावले याच्याविरोधात गंभीर आरोप असून, न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यानंतर पोलिसांकडून विकास गोगावले फरार असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, या पार्श्वभूमीवर आता खुद्द मंत्री भरत गोगावले यांनी मोठा आणि धक्कादायक दावा केला आहे.
निवडणुकीच्या दिवशी झालेल्या या राड्यात विकास गोगावलेसह एकूण २९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर तब्बल २४ दिवस उलटूनही विकास गोगावले (Vikas Gogawale) पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे पोलीस यंत्रणा आणि प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. अशातच गोगावलेंच्या ताज्या वक्तव्यामुळे प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.
मुलगा फरार नाही, संपर्कात आहे; भरत गोगावलेंची कबुली :
धाराशिव दौऱ्यावर असताना मंत्री भरत गोगावले यांनी तुळजाभवानीच्या दर्शनावेळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, त्यांचा मुलगा फरार नाही आणि त्याच्याशी नियमित बोलणं सुरू आहे. पोलिसांपासून तो लपून बसलेला नसून, कायदेशीर मार्गानेच पुढील प्रक्रिया सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
भरत गोगावले म्हणाले की, अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आला होता, मात्र तो फेटाळण्यात आला. आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली असून, तिथेही जामीन नाकारला गेला तर मुलाला पोलिसांसमोर हजर केलं जाईल, असा दावा त्यांनी केला. मात्र, मुलगा संपर्कात असताना आणि बोलणं सुरू असताना त्याला तात्काळ पोलिसांसमोर का हजर केलं जात नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.
Bharat Gogawale | पोलिसांवर दबाव आहे का? विरोधकांचे सवाल तीव्र :
मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांच्या वक्तव्यानंतर पोलिस यंत्रणेच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. एखादा आरोपी जर मंत्र्यांच्या थेट संपर्कात असेल, तर तो २४ दिवसांपासून पोलिस दप्तरी फरार कसा राहू शकतो, असा सवाल विरोधक विचारत आहेत. पोलिसांवर राजकीय दबावाखाली काम केलं जात आहे का, अशी शंका यामुळे अधिकच बळावली आहे.
दरम्यान, विकास गोगावले नेमका कुठे आहे, याची माहिती पोलिसांना अद्याप कशी मिळाली नाही, हा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. महाडमधील मारहाण प्रकरण हे केवळ कायदा-सुव्यवस्थेचं नव्हे, तर राजकीय नैतिकतेचंही प्रकरण बनलं आहे. पुढील काही दिवसांत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि पोलिसांची पुढील कारवाई या प्रकरणात निर्णायक ठरणार असल्याचं चित्र आहे.






