Bharat Bandh | केंद्र सरकारने कामगार कायद्यात केलेल्या बदलांविरोधात देशभरातील दहा केंद्रीय कामगार संघटनांनी गुरुवार, 12 फेब्रुवारी 2026 रोजी भारत बंदची हाक दिली आहे. या आंदोलनाला शेतकरी संघटना तसेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनेही पाठिंबा दिला असून, त्यामुळे बंदचा प्रभाव अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांसाठी काय सेवा सुरू राहणार आणि काय बंद असणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
कामगार कायद्यांतील बदलांमुळे कामगारांचे अधिकार कमी होतील, रोजगाराच्या संधी घटतील आणि खासगीकरणाला चालना मिळेल, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. याच कारणामुळे काँग्रेस पक्षानेही या बंदला पाठिंबा दिला असून, महाराष्ट्रात काँग्रेस पदाधिकाऱ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलनात सहभागी होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
भारत बंदला काँग्रेसचा पाठिंबा :
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश पाटील (Ganesh Patil) यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रातील भाजपा सरकारचे धोरण हे शेतकरी आणि कामगारविरोधी असल्याचा आरोप करत काँग्रेस पक्ष भारत बंदमध्ये सक्रिय सहभाग घेणार आहे. त्यामुळे विविध ठिकाणी निदर्शने, मोर्चे आणि आंदोलन होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम सार्वजनिक वाहतूक आणि दैनंदिन सेवांवर दिसून येऊ शकतो.
या भारत बंदमध्ये INTUC, AITUC, HMS, CITU, AIUTUC, TUCC, SEWA, AICCTU, LPF आणि UTUC या दहा केंद्रीय कामगार संघटनांचा सहभाग आहे. चार नवीन कामगार कायद्यांमुळे कामगारांचे हक्क हिरावले जात असल्याचा आरोप करत या संघटनांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे या आंदोलनाला राजकीय बळ मिळाल्याचे मानले जात आहे.
Bharat Bandh | काय बंद राहणार, काय सुरू असेल? :
12 फेब्रुवारी रोजी शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालये बंद ठेवण्याचा कोणताही अधिकृत आदेश नाही. मात्र केरळ, कर्नाटक आणि ओडिशा यांसारख्या काही राज्यांमध्ये बंदचा प्रभाव अधिक जाणवण्याची शक्यता आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा विस्कळीत झाल्यास काही ठिकाणी शाळा आणि कॉलेज प्रशासन स्थानिक पातळीवर सुट्टी जाहीर करू शकते.
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कामकाज उद्या प्रभावित होण्याची शक्यता आहे, कारण बँक कर्मचारी संघटनांनी संपात सहभागी होण्याची घोषणा केली आहे. मात्र रिझर्व्ह बँक किंवा केंद्र सरकारकडून अधिकृत सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही. रुग्णालये, औषध दुकाने आणि अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत, तर सामान्य नागरिकांनी प्रवास करताना खबरदारी घेण्याचा सल्ला दिला जात आहे.






