Beed Nagar Parishad Election | बीड जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांचे निकाल हाती येऊ लागल्याने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. सत्ताधारी महायुतीतील घटक असलेल्या भाजपने बीडमध्ये जोरदार मुसंडी मारत अनेक ठिकाणी निर्णायक आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे अजित पवार गटासाठी महत्त्वाचा मानला जाणारा बीड जिल्हा यावेळी त्यांच्या हातातून निसटताना दिसत असल्याने हा निकाल धनंजय मुंडे आणि अजित पवारांसाठी अनपेक्षित धक्का मानला जात आहे.
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकांमध्ये भाजपचे उमेदवार आघाडीवर असून अजित पवार गटाचे उमेदवार पिछाडीवर पडल्याचे चित्र आहे. बीड नगरपरिषदेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार थेट तिसऱ्या क्रमांकावर घसरला असून भाजपचीच सरशी स्पष्ट होत आहे. त्यामुळे बीडमध्ये दीर्घकाळ प्रभाव असलेल्या धनंजय मुंडेंच्या राजकीय पकडीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बीड नगरपरिषदेत भाजपची आघाडी, अजित पवार गट पिछाडीवर :
बीड नगरपरिषदेत भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ज्योती घुमरे या आघाडीवर असून दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या स्मिता वाघमारे आहेत. अजित पवार गटाच्या उमेदवार प्रेमलता पारवे या तिसऱ्या स्थानी फेकल्या गेल्याने हा निकाल अजित पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. नगरसेवक पदांच्या निकालातही भाजप, शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळत आहे.
आत्तापर्यंत जाहीर झालेल्या निकालांनुसार बीडमध्ये आठ नगरसेवक पदांचे निकाल समोर आले असून त्यामध्ये भाजपचे तीन, अजित पवार गटाचे तीन आणि शरद पवार गटाचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. मात्र नगराध्यक्षपदाच्या लढतीत भाजपची आघाडी निर्णायक मानली जात आहे.
Beed Nagar Parishad Election | गेवराईत भाजपचा डंका, जिल्हाभर भाजपची सरशी :
बीड जिल्ह्यातील गेवराई नगरपरिषदेतही अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. येथे भाजपचे माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या भाऊजाई गीता पवार या नगराध्यक्षपदाच्या लढतीत आघाडीवर असून अजित पवार गटाच्या आमदार विजयसिंह पंडित यांच्या उमेदवार शीतल दाभाडे पिछाडीवर पडल्या आहेत. नगरसेवक पदांच्या निकालात गेवराईत भाजपचे आठ तर अजित पवार गटाचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. (Dhananjay Munde)
एकूणच बीड जिल्ह्यात भाजपचा डंका वाजताना दिसत आहे. सहापैकी सहा ठिकाणी भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आघाडीवर आहेत. बीड, माजलगाव, धारूर आणि गेवराई येथे भाजपची स्थिती मजबूत असून अंबाजोगाईत भाजपचे नंदकिशोर मुंदडा विजयी झाले आहेत. येथे अजित पवार गटाचे उमेदवार राजकिशोर मोदी यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. परळीत मात्र भाजप आणि अजित पवार गटाच्या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. (BJP vs Ajit Pawar)
या निकालांमुळे बीड जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून भाजपसाठी हा मोठा आत्मविश्वास देणारा निकाल ठरत आहे, तर धनंजय मुंडे आणि अजित पवार गटासाठी आत्मपरीक्षणाची वेळ आल्याचे बोलले जात आहे.






