BCCI SOP Rules | आयपीएल 2025 हंगामात खेळाडूंना आता केवळ प्रतिस्पर्धी संघांशीच नव्हे, तर बीसीसीआयच्या नव्या नियमांशीही सामना द्यावा लागणार आहे. भारतीय संघासाठी लागू करण्यात आलेले SOP नियम आता आयपीएलमध्येही लागू होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर दिसून येणार आहे. (BCCI SOP Rules)
मैदानात आणि ड्रेसिंग रूममध्ये कुटुंबीयांना पूर्ण बंदी
बीसीसीआयने आयपीएल 2025 साठी तयार केलेल्या नियमांनुसार आता कोणत्याही खेळाडूच्या कुटुंबातील सदस्यांना मैदानावर किंवा ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश मिळणार नाही. सामना सुरू असो वा सराव, केवळ अधिकृत अधिकाऱ्यांनाच PMOA (Player and Match Officials Area) मध्ये परवानगी असेल. याआधी कुटुंबीयांना सामना दरम्यान खेळाडूंशी संपर्क ठेवण्याची मुभा होती, मात्र आता हा नियम पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे.
हेच नाही तर, प्रॅक्टिसच्या दिवशी देखील कुटुंबीयांना संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये येण्याची परवानगी दिली जाणार नाही. बीसीसीआयच्या या निर्णयामुळे सर्व खेळाडूंना आता पूर्णपणे संघातील अधिकृत कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतच दिवस घालवावा लागणार आहे. त्याचप्रमाणे सामना दरम्यान स्लीव्हलेस किंवा सैल कपडे घालण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.
प्रवासा संदर्भातील बदल आणि सपोर्ट स्टाफसाठी नव्या अटी
आतापासून कोणताही खेळाडू सरावासाठी स्वतःच्या वाहनातून येऊ शकणार नाही. सर्व खेळाडूंना संघाच्या अधिकृत बसमधूनच प्रवास करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे संघात शिस्त पाळली जाईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. खेळाडूचे नातेवाईक किंवा मित्र वेगळ्या वाहनातून प्रवास करू शकतात मात्र ते फक्त हॉस्पिटॅलिटी झोनमध्येच सराव पाहू शकतील.
थ्रो डाउन स्पेशालिस्ट आणि नेट बॉलर्सबाबतही बीसीसीआयने स्पष्ट नियम ठरवले आहेत. आता संघांनी सपोर्ट स्टाफ आणि नेट बॉलर्सची यादी पूर्व-अनुमतीसाठी बीसीसीआयकडे सादर करावी लागणार आहे. मान्यता मिळाल्यानंतरच त्यांना ॲक्रिडेशन मिळेल. एखाद्या खेळाडूने आपलं ॲक्रिडेशन कार्ड विसरल्यास त्याला आर्थिक दंडही भरावा लागेल.
Title : BCCI SOP Rules for IPL 2025









