Ishan Kishan News | देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या जबरदस्त फॉर्मात असलेला इशान किशन अचानक चर्चेत आला आहे. शतकी खेळी करूनही त्याला संघातून बाहेर करण्यात आल्याने क्रिकेट वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बीसीसीआयच्या एका आदेशामुळे इशान किशनला विजय हजारे ट्रॉफीतील सामना सोडून थेट घरी परतावे लागले आहे. त्याच्या या निर्णयामागे नेमकं कारण काय, याबाबत आता स्पष्ट माहिती समोर आली आहे.
इशान किशनने अलिकडच्या काळात सातत्यपूर्ण कामगिरी करत निवड समितीचे लक्ष वेधून घेतले होते. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत त्याने आक्रमक फलंदाजी करत सर्वाधिक 517 धावा केल्या होत्या. या स्पर्धेत त्याचा स्ट्राईक रेट जवळपास 200 च्या आसपास होता. दोन शतकं आणि दोन अर्धशतकांच्या जोरावर त्याने झारखंडला विजेतेपद मिळवून दिलं होतं. या दमदार फॉर्मच्या जोरावरच त्याची न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी आणि आगामी टी20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली.
शतकी खेळी करूनही संघाबाहेर, बीसीसीआयचा निर्णय :
न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी निवड झाल्यानंतरही इशान किशन विजय हजारे ट्रॉफीत झारखंडकडून खेळत होता. पहिल्याच सामन्यात त्याने अवघ्या 34 चेंडूत शतक ठोकत क्रीडाप्रेमींचं लक्ष वेधून घेतलं. मात्र एवढी जबरदस्त कामगिरी करूनही दुसऱ्या सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आलं.
राजस्थानविरुद्धच्या सामन्यासाठी झारखंडच्या संघात मोठा बदल करण्यात आला. झारखंडचा कर्णधार असलेला इशान किशन या सामन्यात खेळताना दिसला नाही. त्याच्या जागी कुमार कुशाग्रकडे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं. शतकी खेळीनंतर लगेचच संघाबाहेर काढण्यात आल्याने चाहत्यांमध्ये आणि क्रिकेट विश्लेषकांमध्ये चर्चा सुरू झाली. (Vijay Hazare Trophy)
यानंतर स्पष्ट करण्यात आलं की, हा निर्णय झारखंड संघाचा नसून थेट बीसीसीआयचा आहे. बीसीसीआयच्या आदेशानुसार इशान किशनला तातडीचा आराम देण्यात आला असून, त्यामुळे त्याला संघ सोडून घरी परतावे लागले आहे. बीसीसीआयने काळजीपोटी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
Ishan Kishan News | टी20 वर्ल्डकपसाठी फ्रेश ठेवण्याचा बीसीसीआयचा डाव :
विजय हजारे ट्रॉफीत राजस्थानविरुद्धच्या सामन्यावेळी झारखंडचं नेतृत्व करणाऱ्या कुमार कुशाग्रने याबाबत माहिती दिली. त्याने सांगितलं की, बीसीसीआयने इशान किशनला विश्रांती घेण्यास सांगितलं आहे. त्यामुळे तो सध्या घरी परतला असून 2 जानेवारीपासून पुन्हा संघासोबत उपलब्ध असेल.
बीसीसीआयच्या या निर्णयामागे इशान किशनची आंतरराष्ट्रीय जबाबदारी कारणीभूत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेसोबतच त्याची निवड टी20 वर्ल्डकप 2026 साठीही झाली आहे. अशा परिस्थितीत देशांतर्गत स्पर्धेदरम्यान दुखापतीचा धोका टाळण्यासाठी बीसीसीआय कोणताही धोका घ्यायला तयार नाही. त्यामुळे त्याला वेळेआधीच आराम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Ishan Kishan News)
इशान किशनचा सध्याचा फॉर्म टीम इंडियासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात त्याने अवघ्या 39 चेंडूत 125 धावांची खेळी करत 14 षटकार ठोकले होते. त्याच्या या खेळीमुळे झारखंडचा विजय निश्चित झाला होता. अशा फॉर्मात असलेला फलंदाज टी20 वर्ल्डकपमध्ये भारतासाठी मॅच विनर ठरू शकतो, हे लक्षात घेऊन बीसीसीआय सावध पवित्रा घेत आहे. (Vijay Hazare Trophy
बीसीसीआयचा हा निर्णय दीर्घकालीन दृष्टीने टीम इंडियासाठी फायदेशीर ठरू शकतो. इशान किशन फ्रेश आणि फिट राहिला, तर आगामी टी20 मालिकांमध्ये आणि वर्ल्डकपमध्ये त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा ठेवण्यात येणार आहेत.






