Banglore | बेंगळूरुमध्ये नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या २२ वर्षीय विद्यार्थिनीने केलेला सामूहिक बलात्काराचा आरोप तपासानंतर खोटा असल्याचे उघडकीस आले आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि टॅक्सी ड्रायव्हरसोबत झालेल्या व्हॉट्सॲप चॅट्समुळे हा प्रकार संमतीने घडल्याचे स्पष्ट झाले आहे.
नक्की काय घडलं ?
मूळची केरळची असलेली ही विद्यार्थिनी ६ डिसेंबर रोजी मडीवाला पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली. तिने तक्रार दिली की २ डिसेंबरच्या रात्री सर एम. विश्वेश्वरैया टर्मिनलजवळ टॅक्सी ड्रायव्हर आणि त्याच्या मित्रांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करून ३३ वर्षीय टॅक्सी ड्रायव्हरला अटक केली, जो विवाहित असून त्याला दोन मुले आहेत.
फुटेजमध्ये धक्कादायक माहिती समोर-
पोलिसांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज (Banglore) तपासले असता धक्कादायक सत्य समोर आले. २ डिसेंबरच्या रात्री ११.३० वाजल्यापासून ते ३ डिसेंबरच्या पहाटे ५.३० वाजेपर्यंत विद्यार्थिनी आणि टॅक्सी ड्रायव्हर स्टेशनवर एकत्र दिसत होते. विद्यार्थिनीने सांगितलेले कथित साथीदार फुटेजमध्ये कोठेही आढळले नाहीत. फुटेजमध्ये दोघेही टॅक्सीतून बाहेर पडल्यानंतर एकत्र फिरताना आणि नंतर पुन्हा गाडीत बसून फिरताना दिसत होते. पहाटे ५.३० नंतर ती महिला एर्नाकुलम ट्रेनमध्ये बसली.
टॅक्सी ड्रायव्हरच्या (Banglore) व्हॉट्सॲप मेसेजेसमध्येही विद्यार्थिनीने त्याला ३ डिसेंबरपासून अनेक मेसेजेस पाठवले होते, ज्यात त्यांच्यातील संबंध भेटीनंतरही चांगले असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी विद्यार्थिनीला चौकशीसाठी बोलावले तेव्हा तिने कबूल केले की, मानेवरील लव्ह बाईट्स आणि ओरखड्यांवरून प्रियकराने विचारणा केल्यास त्याला उत्तर देणं टाळण्यासाठी तिने ही खोटी तक्रार दाखल केली होती. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि ड्रायव्हरने आपण निर्दोष असल्याचा दावा केला आहे.






