Auto Driver Rules | महाराष्ट्रातील ऑटो आणि टॅक्सी चालकांना (Auto Drivers) गणवेष घालणे बंधनकारक करण्यात आले असून त्याचे पालन न केल्यास आता दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून (RTO) हे निर्देश देण्यात आले असून लवकरच शहरात यासाठी विशेष तपासणी मोहीम सुरू होणार आहे.
टॅक्सी आणि रिक्षाचालकांना गणवेष सक्तीचाच
महाराष्ट्र मोटार वाहन नियमांनुसार ऑटो-रिक्शा व टॅक्सी चालकांना वाहन चालवताना गणवेष परिधान करणे आवश्यक आहे. या नियमाचे उल्लंघन होत असल्याचे लक्षात येताच पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने यावर लक्ष केंद्रीत केले आहे. संबंधित चालक गणवेष परिधान करीत नसल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे परिवहन विभागाचे (RTO) स्पष्ट म्हणणे आहे.
यासंदर्भात विभागाकडून लवकरच शहरात मोहीम राबवली जाणार असून या मोहिमेमध्ये शहरातील प्रमुख चौकांवर वाहनांची तपासणी केली जाणार आहे. यावेळी गणवेष न घालणाऱ्या चालकांकडून दंड वसूल करण्यात येणार आहे. रिक्षा व टॅक्सी चालकांनी ऑक्टोंबर महिन्यापासूनच ही अट पूर्ण करणे बंधनकारक आहे, मात्र अजूनही बऱ्याच चालकांकडून याकडे दुर्लक्ष होत आहे.
नियम तोडल्यास दंडाची कार्यवाही
स्थानिक कायद्यांनुसार रिक्षा किंवा टॅक्सी चालकांनी नियमित पांढऱ्या रंगाचा फुलशर्ट आणि खाकी रंगाची पँट परिधान करणे बंधनकारक आहे. हे गणवेष वाहनधारकाच्या अधिकृत ओळखीचा भाग मानला जातो. यासोबतच ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहन नोंदणी कागदपत्रे देखील बरोबर ठेवणे आवश्यक आहे. यातील कोणताही नियम मोडल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशारा पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने दिला आहे.
परिवहन अधिकाऱ्यांनी सांगितले की, वाहनचालक गणवेष परिधान करत नसतील किंवा त्यांच्या वर्तनामुळे प्रवाशांना त्रास होत असेल, तर नागरिकांनी प्रवासी सुविधा ॲपद्वारे तक्रार नोंदवावी. या तक्रारींची गंभीर दखल घेण्यात येईल आणि दोषी आढळणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.








