आता ATM मधून पैसे काढणं होणार महाग; किती पैसे मोजावे लागणार?

On: March 26, 2025 2:04 PM
ATM withdrawal Charges Now Costlier
---Advertisement---

ATM withdrawal Charges | मे महिन्यापासूनATM व्यवहारांशी संबंधित नियमांमध्ये बदल होणार असून, ATM वापरणाऱ्यांच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI) ATM इंटरचेंज शुल्क वाढवल्यामुळे, मोफत मर्यादा ओलांडल्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. (ATM withdrawal Charges)

मोफत व्यवहार मर्यादा ओलांडली, तर जास्त शुल्क

ATMमधून पैसे काढताना ग्राहक सध्या मेट्रो शहरांमध्ये महिन्याला 5 आणि गैर-मेट्रो शहरांमध्ये 3 मोफत व्यवहार करू शकतात. मात्र या मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार झाल्यास, त्यासाठी अधिक शुल्क आकारले जाणार आहे. नवीन नियमानुसार, आर्थिक व्यवहारांसाठी आधी 17 रुपये शुल्क होते, ते आता 19 रुपये करण्यात आले आहे. तसंच शिल्लक चौकशी (Balance Enquiry) साठीचे शुल्कही 6 रुपयांवरून वाढवून 7 रुपये करण्यात आले आहे.

ग्राहकांनी जर एखाद्या इतर बँकेच्या ATMमधून पैसे काढले आणि मोफत व्यवहारांची संख्या ओलांडली, तर प्रत्येक अतिरिक्त व्यवहारासाठी हे वाढीव शुल्क लागू होणार आहे. त्यामुळे ATMमधून नियमितपणे पैसे काढणाऱ्या व्यक्तींना आता आपली व्यवहार योजना नव्याने आखावी लागेल.

शुल्कवाढीचं कारण आणि डिजिटल पेमेंटचा प्रभाव

ही शुल्कवाढ व्हाइट-लेबल ATM ऑपरेटरच्या मागणीमुळे करण्यात आली आहे. त्यांचं म्हणणं आहे की, ATM मेंटेनन्स आणि ऑपरेशनचा खर्च वाढला असून, तो भागवण्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारणे आवश्यक आहे. RBIने त्यांच्या या मागणीला मान्यता दिली आहे, आणि आता बँकांना हे शुल्क ग्राहकांकडून वसूल करण्यास परवानगी मिळाली आहे.

दरम्यान, डिजिटल पेमेंट पद्धतीच्या प्रचंड वाढीमुळे ATMच्या वापरात घट झाली आहे. 2014 मध्ये भारतातील डिजिटल व्यवहारांचे मूल्य 952 लाख कोटी रुपये होते, जे 2023 मध्ये 3,658 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. त्यामुळे अनेक बँकांनी नवीन ATM स्थापन करणे किंवा जुन्यांचे देखभाल करणे टाळले आहे. UPI, मोबाईल वॉलेट्स आणि QR कोडच्या माध्यमातून व्यवहार करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

यामुळे भविष्यात रोखीऐवजी डिजिटल व्यवहारच अधिक सामान्य ठरण्याची शक्यता आहे. मात्र, ज्यांना अजूनही कॅशची गरज असते, त्यांच्यासाठी ATM व्यवहार अधिक महाग होणार हे निश्चित आहे.

 Title : ATM withdrawal Charges Now Costlier

 

Join WhatsApp Group

Join Now