Ashok Chavan | महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना सध्या वेग आला आहे. एका बाजूला शिवसेना (ठाकरे गट) नेते सुधाकर बडगुजर (Sudhakar badgujar) यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश करून चर्चेचा विषय निर्माण केला आहे, तर दुसरीकडे सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसुनेनं म्हणजेच जयश्री पाटील (Jayshree Patil) यांनी काँग्रेसला रामराम ठोकला असून त्या बुधवारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे.
काँग्रेस नेतृत्वहीन, प्रेरणाविना पक्ष – अशोक चव्हाणांची टीका :
या पार्श्वभूमीवर भाजप खासदार आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. “काँग्रेस हा आता नात्यागोत्यांचा पक्ष बनला आहे. पक्षात कोणतंही प्रभावी नेतृत्व उरलेलं नाही. पक्षाला दिशा देणारा रोडमॅपच नाही,” असं म्हणत चव्हाणांनी काँग्रेसच्या अस्थिरतेवर बोट ठेवलं.
ते पुढे म्हणाले, “मागील अकरा वर्षांत जेवढा देशाचा विकास झाला आहे, तो पूर्वीच्या तुलनेत दुपटीने वेगाने झाला आहे. आजचा जमाना आयपीएलचा आहे, कमीत कमी वेळात मोठं लक्ष्य गाठणं महत्त्वाचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2047 पर्यंत ‘विकसित भारत’चं स्वप्न उभं केलं आहे, हे आमचं ध्येय आहे.”
Ashok Chavan | जयश्री पाटील यांच्यावर काँग्रेसची कारवाई आणि भाजपकडून निमंत्रण :
जयश्री पाटील या काँग्रेसचे दिवंगत नेते मदन पाटील यांच्या पत्नी असून, काही काळापूर्वी त्यांनी काँग्रेसविरोधात बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवली होती. यानंतर काँग्रेसने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. त्यानंतर त्यांनी वेगळी वाट चालण्याचा निर्णय घेतला. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून त्यांना आमंत्रण होतं, मात्र त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. (Ashok Chavan)
राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयश्री पाटील यांच्या निवासस्थानी भेट देत प्रवेशाची रूपरेषा ठरवली. या भेटीनंतर त्यांनी भाजप प्रवेशाचा मुहूर्त निश्चित केला असून बुधवार (१८ जून) रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जयश्री पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.






