Vaishnavi Hagwane | पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आता नव्या घडामोडी समोर येत आहेत. वैष्णवीने सासरच्यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून जीवन संपवले आहे. या प्रकरणात पोलिसांनी तिचा पती, दीर, सासू-सासरे आणि नणंद यांना अटक केली आहे. विशेष म्हणजे, विवाहात तब्बल ५१ तोळे सोने आणि फॉर्च्यूनर कार हुंडा म्हणून दिला गेला होता, तरीही तिचा छळ थांबला नाही.
अंजली दमानियाचा मोठा गौप्यस्फोट :
या घटनेनंतर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) या सक्रिय झाल्या आहेत. त्यांनी या प्रकरणात लवकरच मोठा खुलासा करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्या माध्यमांशी बोलत होत्या. दमानियांच्या मते, हगवणे कुटुंब हे केवळ लोभी नाही तर विकृत वृत्तीचं आहे. यामागे राजकीय पाठबळ असल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
या प्रकरणात वैष्णवीच्या जाऊबाईने, म्हणजे मयुरी जगताप हिने देखील अनेक गंभीर आरोप केले आहेत. तिचा सासरा आणि दीर तिला मारहाण करत होते, कपडे फाडले जात होते, असा आरोप मयुरीने केला आहे. यावर बोलताना दमानिया म्हणाल्या की, मयुरी काहीही कारण नसताना आरोप करेल अशी नाही. मयुरीच्या आईने महिला आयोगाला लिहिलेल्या पत्रातही हे उल्लेख आहेत.
जालिंदर सुपेकर आणि निलेश चव्हाण यांची यंत्रणेशी साटेलोटे? :
दमानियांनी राजकीय हस्तक्षेपाचा धक्का बसणारा खुलासा करत सांगितले की, निलेश चव्हाण याच्या बंदुकीच्या परवान्यासाठी जालिंदर सुपेकर यांनी मदत केली होती. जालिंदर सुपेकर हे वैष्णवीचे मामा सासरे आहेत म्हणजेच शशांक हगवणे याचे सख्खे मामा आहेत. हाच निलेश चव्हाण हगवणे कुटुंबाशी जोडला गेलेला आहे. अशा अधिकाऱ्यांच्या मदतीमुळेच वैष्णवीसारख्या महिलांना आपले प्राण गमवावे लागतात, असा थेट आरोप दमानियांनी केला आहे.
दरम्यान, वैष्णवी हगवणे प्रकरणातील अंजली दमानियांच्या या खुलास्यामुळे पुढील काळात या गुन्ह्याच्या खोलात किती गडबड उघडकीस येईल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.






