Andekar Gang | पुण्यातील नाना पेठ परिसरात गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी झालेल्या आयुष कोमकर खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आंदेकर टोळीच्या सदस्यांना आगामी महानगरपालिका निवडणूक लढविण्यास विशेष न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करताना कोणतीही मिरवणूक, प्रचार यात्रा, भाषण किंवा घोषणाबाजी करता येणार नाही, असे स्पष्ट आदेश विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी दिले आहेत.
या प्रकरणात आंदेकर टोळीचा मोरक्या बंडू आंदेकर (Bandu Andekar), त्याची भावजय लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि सून सोनाली वनराज आंदेकर हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तरीही ‘निवडणूक लढविणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे’ या भूमिकेवर विशेष न्यायालयाने त्यांना पोलीस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास परवानगी दिली आहे.
आज अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया :
न्यायालयाच्या आदेशानुसार बंडू आंदेकर, लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर हे आज, शनिवार 27 डिसेंबर रोजी आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महापालिका निवडणुकीसाठी 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असून, त्याआधीच आंदेकर कुटुंबीयांनी न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. (Andekar Gang)
नाना पेठेतील टोळीयुद्ध आणि वर्चस्वाच्या वादातून गणपती विसर्जनाच्या पूर्वसंध्येला आंदेकर टोळीने आयुष कोमकर याची गोळ्या घालून हत्या केली होती. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणाचा सूड उगवण्यासाठी आयुष कोमकरला लक्ष्य करून हा खून करण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
Andekar Gang | पोलीस बंदोबस्तातच अर्ज दाखल करण्याचे आदेश :
आयुष कोमकर (ayush komkar) हत्या प्रकरणात कोठडीत असलेल्या आरोपींनी आगामी महापालिका निवडणूक लढविण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. आंदेकर यांच्या वतीने अॅड. मिथुन चव्हाण यांनी न्यायालयात अर्ज सादर केला होता. या अर्जात उमेदवारी अर्ज दाखल करताना सशुल्क पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी करण्यात आली होती.
विशेष न्यायालयाने ही मागणी मान्य करत आरोपींना पोलीस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास परवानगी दिली. मात्र या प्रक्रियेदरम्यान कोणत्याही प्रकारची मिरवणूक, प्रचारयात्रा, घोषणाबाजी किंवा सार्वजनिक भाषण करता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, नाना पेठेतील जमिनीचा बेकायदा ताबा घेतल्याप्रकरणी बंडू आंदेकरला धुळे कारागृहातून ताब्यात घेऊन समर्थ पोलिसांनी अलीकडेच अटक केली होती. या प्रकरणात न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.






