Amol Balwadkar | पुण्यातील प्रभाग ९ मध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवरून वातावरण तापले असून अमोल बालवडकर यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. उमेदवारी निवडीतील चुकीच्या निर्णयांमुळे चंद्रकांत पाटील यांना मोठ्या टीकेला सामोरं जावं लागत असल्याचं बालवडकर यांनी म्हटलं आहे. या विधानामुळे प्रभाग ९ मधील राजकारणाला नवा वळण मिळालं आहे.
चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची आजपर्यंत केलेली कोणतीही राजकीय भविष्यवाणी खरी ठरलेली नाही, असा टोला लगावत अमोल बालवडकर यांनी त्यांच्या निर्णयक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. चुकीच्या उमेदवारांच्या निवडीमुळे पक्षांतर्गत नाराजी वाढली असून, त्याचाच फटका आता चंद्रकांत पाटील यांना बसत असल्याचा दावा त्यांनी केला.
प्रतिष्ठेचा प्रश्न बनला; दारोदारी फिरण्याची वेळ आली :
अमोल बालवडकर म्हणाले की, उमेदवारीच्या मुद्द्यावर झालेल्या टीकेमुळे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेचा प्रश्न बनली आहे. त्यामुळेच एकेकाळी राज्यातील ताकदवान नेते मानले जाणारे चंद्रकांत पाटील आता प्रभाग ९ मध्ये दारोदारी फिरताना दिसत आहेत. एका माजी प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्र्याला अशी परिस्थिती येणं हे दुर्दैवी असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
प्रभागातील जनमत स्पष्ट असल्याचा दावा करत बालवडकर यांनी सांगितलं की, चंद्रकांत पाटील जितके जास्त या प्रभागात फिरतील, तितकी आमची आघाडी वाढत जाईल. कारण आता नागरिकांना भाषणांचं नव्हे तर कामाचं राजकारण अपेक्षित आहे, असं ते म्हणाले.
Amol Balwadkar | निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरच लढणार असल्याचा निर्धार :
अमोल बालवडकर (Amol Balwadkar) यांनी या निवडणुकीत जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याचा पुनरुच्चार केला आहे. पाणी, रस्ते, वाहतूक, स्वच्छता आणि नागरी सुविधांसारख्या विषयांवर ठोस काम करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. केवळ आरोप-प्रत्यारोपांवर नव्हे तर प्रत्यक्ष विकासाच्या निकषांवर ही निवडणूक लढली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
प्रभाग ९ मध्ये सुरू असलेली ही शाब्दिक चकमक आगामी निवडणुकीत कोणाला फायदा करून देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकीकडे भाजपकडून प्रचाराला वेग आला असताना, दुसरीकडे अमोल बालवडकर यांच्या आक्रमक भूमिकेमुळे स्थानिक राजकारणात चांगलाच रंग भरताना दिसत आहे.






