Manikrao Kokate | राज्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी अमरावती येथे जिल्हा कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन आणि शेतकऱ्यांशी संवाद साधताना वादग्रस्त विधान केले. “भिकारीसुद्धा 1 रुपया घेत नाही, आम्ही 1 रुपयात शेतकऱ्यांना पीकविमा देतो,” असे ते म्हणाले. या विधानामुळे राज्यात तीव्र पडसाद उमटले आहेत.
कोकाटेंचे स्पष्टीकरण
एक रुपयात पीक विमा योजना बंद करुन सरकार 100 रुपयात पीक विमा योजना आणण्याच्या विचारात आहे का?, असा सवाल माणिकराव कोकाटे यांना करण्यात आला होता. यावर बोलताना माणिकराव कोकाटे म्हणाले की, “सरकारला पीक विमा बंद करायचा नाही, पण गैरप्रकार थांबवण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतील.”
माध्यमांशी बोलताना कोकाटे म्हणाले की, एक रुपयात पीक विमा योजना बंद करण्याचा शासनाचा कोणताही विचार नाही. मात्र, या योजनेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. अन्य राज्यांतील लोकांनीही अर्ज केले. चौकशीनंतर चार लाख अर्ज रद्द करण्यात आले. सीएससी (CSC) केंद्रचालक असे प्रकार करत असावेत, असा संशय त्यांनी व्यक्त केला.
एक रुपयामुळे बाहेरच्या कंपन्यांचे गैरप्रकार वाढले
शेतकऱ्यांना अचूक आणि त्वरित माहिती मिळावी या उद्देशानं, थेट संपर्क साधता यावा म्हणून कायमस्वरूपी हेल्पलाइन क्रमांक जारी केला जाईल असंही माणिकराव कोकाटे म्हणालेत.
कोकाटे (Kokate) यांनी सांगितले की, एक रुपयामुळे बाहेरच्या कंपन्यांचे गैरप्रकार वाढले. बाहेरच्या कंपन्यांनी ऑनलाइन (Online) अर्ज भरले. एक रुपयात विमा (Insurance) स्वस्त असल्याने त्या कंपन्यांनी गैरफायदा घेतला. हा गैरफायदा घेऊ नये म्हणून विम्याच्या संदर्भात आम्ही पुनर्विचार करत आहोत आणि अभ्यास करून धोरण ठरवू.
Title : Agriculture Minister Manikrao Kokate Controversial Statement






