तरुणांसाठी गुड न्यूज! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात होणार आयटी पार्क

On: December 14, 2025 1:23 PM
Maharashtra IT Park
---Advertisement---

Maharashtra IT Park | महाराष्ट्रात आयटी क्षेत्राचा विस्तार झपाट्याने होत असून पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमुळे राज्याला आयटी हबची ओळख मिळाली आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा आयटी पार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीमुळे हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. पुण्याच्या एकात्मिक विकासात आयटी क्षेत्राचा मोठा वाटा राहिला असून, आता राज्यात आणखी नवीन आयटी पार्क उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. (Maharashtra IT Park)

हिंजवडीपाठोपाठ पुणे जिल्ह्यातील पुरंदर (Purandar IT Park) येथे नवीन आयटी पार्क प्रस्तावित असून, त्यानंतर सातारा जिल्ह्यातही आयटी पार्क उभारण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. साताऱ्यात आयटी पार्क सुरू होण्यापूर्वी टाटा टेक्नॉलॉजीकडून प्रशिक्षण केंद्र विकसित करण्यात येणार असून, या माध्यमातून हजारो तरुणांना आयटी सेक्टरशी संबंधित कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे ग्रामीण आणि निमशहरी भागातील युवकांसाठी मोठी संधी निर्माण होणार आहे.

कोल्हापूरला मिळणार आयटी पार्कची मोठी भेट

दरम्यान, पुरंदर आणि साताऱ्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एका महत्त्वाच्या जिल्ह्याला आयटी पार्क मिळणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर येथेही आयटी पार्क विकसित करण्यात येणार असून, हा विषय अखेर मार्गी लागला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कागदावर असलेला कोल्हापूर आयटी पार्कचा प्रस्ताव आता प्रत्यक्षात उतरण्याची चिन्हे दिसत आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल विभागाच्या मुख्य सचिवांना कोल्हापूर आयटी पार्कसाठी शेंडा पार्क येथे जागा उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे कोल्हापूरकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होणार असून, जिल्ह्यातील हजारो तरुणांच्या हाताला रोजगार मिळण्याची शक्यता आहे.

Maharashtra IT Park | 42 हेक्टर जमीन उपलब्ध करण्याचा प्रस्ताव :

कोल्हापूर  (Kolhapur IT Park) जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आयटी पार्कसाठी जमीन उपलब्ध करून देण्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात आला होता. तसेच, पुणे विभागीय आयुक्तांचा महत्त्वपूर्ण अहवाल अप्पर मुख्य सचिवांकडे सादर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानंतर आता कोल्हापूर आयटी पार्क, जिल्हा क्रीडा संकुल आणि शासकीय दंत वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

आमदार महाडिक यांनी कोल्हापुरातील शेंडा पार्क परिसरात आयटी पार्कसाठी 34 हेक्टर, जिल्हा क्रीडा संकुलासाठी 6 हेक्टर आणि शासकीय दंत वैद्यकीय महाविद्यालयासाठी 2 हेक्टर, अशी एकूण 42 हेक्टर जमीन उपलब्ध करून देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल विभागाला तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.

महाराष्ट्राला मिळणार चौथे आयटी पार्क :

दरम्यान, आयटी पार्कसाठी कृषी विभागाची जमीन वापरली जाणार असल्याने कृषी विभागाला पर्यायी जागा देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनीही या विषयाकडे विशेष लक्ष दिले होते. गेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार क्षीरसागर यांनी यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केला होता.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश मिळाल्यानंतर कोल्हापूर आयटी पार्कचा बहुप्रतिक्षित विषय अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. पुरंदर, सातारा आणि पुणे (हिंजवडी) यांच्यासोबत आता कोल्हापूरमध्ये आयटी पार्क साकार झाल्यास, महाराष्ट्रात एकूण चार मोठे आयटी पार्क कार्यरत असतील. कोल्हापुरातील आयटी पार्क हे राज्याचे चौथे आयटी पार्क ठरणार असून, यामुळे पश्चिम महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

News Title: After Purandar and Satara, Kolhapur to Get IT Park: Thousands of Job Opportunities for Youth in Maharashtra

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now