Covid19 | राज्यात कोरोनाचा धोका वाढत चालल्याचा इशारा सार्वजनिक आरोग्य (health) विभागाकडून देण्यात आला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ४५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी ३५ रुग्ण मुंबईतील आहेत. पुणे, रायगड, कोल्हापूर, ठाणे आणि लातूर जिल्ह्यांतही कोरोनाचे (Covid19) काही रुग्ण सापडले आहेत. यामुळे कोरोना रुग्णसंख्येत सतत वाढ होत असल्याचे दिसत आहे. या महिन्यात आतापर्यंत राज्यात एकूण १७७ रुग्णांचे कोरोना तपासणीत संक्रमण आढळले आहे.
मुंबईत वृद्धाचा मृत्यू
मुंबईमध्ये ७३ वर्षाच्या एका वृद्ध रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हा रुग्ण आधीपासूनच काही गंभीर आजारांनी त्रस्त होता. राज्यातील आरोग्य विभागानुसार, आतापर्यंत कोरोनामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून ते दोघेही गंभीर आजारांनी ग्रस्त होते. राज्यात १ जानेवारी ते २३ मे या काळात ६८१९ संशयितांच्या कोरोना चाचण्या केल्या गेल्या. यातील २१० जणांमध्ये कोरोना संक्रमण निश्चित झाले. त्यापैकी मुंबईत सर्वाधिक १८३ रुग्ण आढळले आहेत.
हरियाणातही रुग्ण वाढ
राज्यातील विविध भागांत फ्लू असलेल्या रुग्णांचे सर्वेक्षण सुरू आहे. त्यातून संशयितांना कोरोना तपासणीसाठी घेण्यात येत आहे. राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये कोरोना तपासणी आणि उपचार सुविधा उपलब्ध असल्यामुळे नागरिकांनी काळजी करू नये, असे आरोग्य सहसंचालिका डॉ. बबिता कमलापूरकर यांनी सांगितले आहे.
फक्त महाराष्ट्रातच (Maharashtra)नव्हे तर हरियाणा राज्यातही कोरोनाच्या रुग्णांची वाढ झाली आहे. हरियाणातील गुरुगाव आणि फरिदाबाद येथे देखील कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लोकांनी सुरक्षेचे उपाय काळजीपूर्वक पाळणे गरजेचे आहे. मास्कचा वापर, हात धुणे, सामाजिक अंतर राखणे आणि लसीकरणाचे महत्त्व अजूनही तितकेच आहे. आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनानुसार आपण सर्वांनी सजग राहून कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.






