Vasai Virar Water Cut | वसई, विरार शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना समोर आली आहे. वसई-विरार महापालिकेकडून मिळणाऱ्या पाणीपुरवठ्यावर काही दिवसांसाठी परिणाम होणार आहे. तांत्रिक कामांमुळे शहरात टप्प्याटप्प्याने शटडाउन घेतला जाणार असल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.
MMRDA मार्फत सुरू असलेल्या सूर्या पाणीपुरवठा योजनेवरील तांत्रिक कामांमुळे 4 एप्रिल ते 10 एप्रिल 2026 या कालावधीत 24 तासांचे शटडाउन घेतले जाणार आहे. त्यामुळे शहराला मिळणाऱ्या सुमारे 150 दशलक्ष लिटर पाण्याची कमतरता जाणवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
कोणत्या भागात कधी पाणी बंद राहणार? :
महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार विविध भागांमध्ये टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा बंद किंवा कमी दाबाने होणार आहे. 4 एप्रिल रोजी विरार पूर्व आणि पश्चिम भागात पाणीपुरवठा बंद राहण्याची शक्यता आहे. 5 एप्रिलला नालासोपारा पूर्व व पश्चिम या भागांमध्ये पाणीपुरवठ्यावर परिणाम होईल. (Vasai Virar Water Cut News)
6 एप्रिल रोजी नवघर आणि वसई परिसरात पाणीपुरवठा बंद राहू शकतो. त्यानंतर 7 एप्रिलला पुन्हा विरार पूर्व व पश्चिम भागात शटडाउन होणार आहे. 8 एप्रिल रोजी नालासोपारा पूर्व व पश्चिम भागात पाणीपुरवठा कमी दाबाने किंवा पूर्ण बंद राहू शकतो. 9 एप्रिलला नवघर आणि वसई भागात पाणीपुरवठ्यावर परिणाम होईल, तर 10 एप्रिलला विरार पश्चिम आणि नालासोपारा पश्चिम येथे पाणीपुरवठा बंद राहण्याची शक्यता आहे.
Vasai Virar Water Cut | नागरिकांना पाणी साठवण्याचे आवाहन :
या कालावधीत पाणीपुरवठा खंडित होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा आणि आवश्यक तेवढा पाण्याचा साठा करून ठेवावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. शटडाउनच्या काळात पाणीपुरवठा कमी दाबाने होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी आधीच तयारी ठेवावी असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, वसई-विरार महानगरपालिकेच्या आयुक्तपदी Prithviraj B. P. यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. त्यांनी शहरातील मूलभूत सुविधा सुधारण्यावर, प्रशासनात पारदर्शकता आणण्यावर आणि पर्यावरण संवर्धनावर विशेष भर देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तसेच नियोजनबद्ध विकासाद्वारे वसई-विरार शहराला भविष्यात ‘ग्रोथ हब’ बनवण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला आहे.






