रामकृष्ण सातव पाटील आयोजित 68 व्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा महासंग्राम वाघोलीत 18 मार्चपासून रंगणार

On: March 13, 2026 5:35 PM
68 Maharashtra Kesari Kushti
---Advertisement---

68 Maharashtra Kesari Kushti | महाराष्ट्राच्या लाल मातीतील सर्वात मोठा आणि मानाचा कुस्ती थरार म्हणजेच ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा. यंदा या स्पर्धेचे 68 वे पर्व असून सर्व कुस्ती प्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे हा कुस्तीचा रणसंग्राम रंगणार आहे. ही भव्य स्पर्धा कधीपासून सुरु होणर याची तारीखही समोर आली आहे. यंदाची स्पर्धा केवळ कुस्तीच्या डावांपुरती मर्यादित नसून, विजेत्या मल्लांवर होणाऱ्या ऐतिहासिक ‘बक्षिसांच्या पावसामुळे’ ती संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे.

42 जिल्ह्यांच्या मातीतून साकारला ‘खास’ आखाडा

पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामकृष्ण सातव पाटील यांच्या पुढाकाराने या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 18 ते 22 मार्च 2026 या कालावधीत ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा पार पडणार आहे. वाघोलीच्या बाजार मैदानावर उभारण्यात आलेल्या ‘स्व. अजितदादा पवार क्रीडानगरी’मध्ये सुमारे 40 हजार प्रेक्षकांना बसण्याची अवाढव्य सोय करण्यात आली आहे. या स्पर्धेचे सर्वात मोठे आणि भावनिक वैशिष्ट्य म्हणजे, येथील लाल मातीच्या आखाड्यासाठी राज्यातील तब्बल 42 जिल्हा कुस्ती संघांकडून पवित्र माती आणण्यात आली आहे. या स्पर्धेत माती आणि गादी (मॅट) अशा दोन्ही विभागांत मिळून 1500 हून अधिक मल्ल आपले नशीब आजमावतील.

बक्षिस वाटप

यंदाच्या ‘महाराष्ट्र केसरी’ विजेत्या मल्लाला मानाची रौप्य गदा (केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यातर्फे) आणि आलिशान ‘फॉर्च्यूनर’ (Fortuner) गाडी देऊन गौरवण्यात येणार आहे. तर, उपविजेत्या (उपमहाराष्ट्र केसरी) मल्लाला ‘स्कॉर्पिओ’ (Scorpio) गाडी मिळेल. बक्षिसांची मालिका इथेच थांबत नाही; वेगवेगळ्या वजनी गटांतील 18 सुवर्णपदक विजेत्यांना थेट ‘रॉयल एनफिल्ड बुलेट’ (Bullet) आणि रौप्यपदक विजेत्यांना ‘स्प्लेंडर’ दुचाकी देऊन सन्मानित केले जाणार आहे.

18 मार्च रोजी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते या महासंग्रामाचे थाटात उद्घाटन होईल. तर 22 मार्च रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत अंतिम सामना आणि बक्षीस वितरण सोहळा पार पडेल. “महाराष्ट्राच्या मल्लांनी ऑलिम्पिकसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव गाजवावे, या हेतूने आम्ही ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय दर्जाची बनवली आहे,” अशी भावना आयोजक रामकृष्ण सातव पाटील यांनी व्यक्त केली.

वाघोलीत रंगणारा हा कुस्तीचा कुंभमेळा राज्यातील प्रत्येक कुस्तीशौकिनासाठी डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरणार आहे.

Join WhatsApp Group

Join Now