Water Cut Bhiwandi | भिवंडीकरांसाठी महत्त्वाची सूचना समोर आली आहे. शहरात देखभाल आणि दुरुस्तीच्या कामामुळे तब्बल 24 तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आधीच पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या निर्णयामुळे भिवंडीतील अनेक भागांमध्ये काही काळ जलसंकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महानगरपालिकेच्या माहितीनुसार, पावसाळ्यापूर्वी आवश्यक देखभाल आणि दुरुस्तीची कामे करण्यासाठी हा शटडाऊन घेण्यात येत आहे. त्यामुळे 23 मार्च रोजी सकाळी 9 वाजल्यापासून ते 24 मार्च रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित राहणार आहे. या कालावधीत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोणत्या भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार? :
या 24 तासांच्या शटडाऊनमुळे भिवंडीतील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ममता टँक परिसर, भिवंडी-नाशिक रोड, चाविंद्र गाव, पटेल नगर, बाला कंपाऊंड, फरीद बाग, संगमपाडा, कचेरीपाडा, ब्राह्मण अली, कासार अली, भाव नगर आणि कोंबडपाडा या भागांचा यात समावेश आहे. तसेच आदर्श पार्क, अजय नगर, गोकुळ नगर, इंदिरा नगर, सेंट्रल तेगरन रोड, बंगलानगर आणि बंगळवेढा या परिसरातही पाणीपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. (Water Cut Bhiwandi)
याशिवाय खडक रोड, अजमेर नगर, शामा नगर, साईनाथ सोसायटी, अंजूर फाटा, देवजी नगर, नारपोली, विठ्ठल नगर, रोशन बाग, निजामपुरा, इस्लामपुरा, म्हाडा कॉलनी, शास्त्री नगर आणि नेहरू नगर या भागांवरही या निर्णयाचा परिणाम होणार आहे. मिल्लत नगर, कोंढा, चांदोळी, कोळगाव, कामठघर, हनुमान नगर, गणेश सिनेमा परिसर, नवजीवन कॉलनी, समद नगर, कणेरी, न्यू कणेरी, गौरीपाडा, अशोक नगर, कोटरगेट, उर्दू रोड, कुरेशी नगर, भादवड आणि टेमघर या भागातील नागरिकांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.
Water Cut Bhiwandi | पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतरही कमी दाबाने पाणी :
महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पुन्हा सुरू केला जाईल. मात्र, शटडाऊननंतर किमान एक दिवस पाणी कमी दाबाने आणि कमी प्रमाणात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा योग्य साठा करून ठेवणे आवश्यक आहे.
प्रशासनाने नागरिकांना पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आणि आवश्यक तेवढेच पाणी वापरण्याचे आवाहन केले आहे. या कालावधीत सर्वांनी सहकार्य केल्यास कामे लवकर पूर्ण होऊन पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.






