MS Dhoni l योगराज सिंह वादग्रस्त विधानांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. भारताचे माजी क्रिकेटपटू आणि युवराज सिंह यांचे वडील योगराज सिंह यांनी नुकतीच एका मुलाखतीत अनेक मुद्द्यांवर परखड भाष्य केले. महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, अर्जुन तेंडुलकर आणि कपिल देव यांच्याबाबत त्यांनी आपली मते स्पष्टपणे मांडली.
विराट, रोहितबाबत सल्ला :
योगराज सिंह म्हणाले, “जर मी भारतीय संघाचा प्रशिक्षक असतो, तर अशी टीम बनवली असती जी वर्षानुवर्षे कोणालाही हरू दिली नसती.” ते पुढे म्हणाले, “जेव्हा कोणी चांगली कामगिरी करत नाही, तेव्हा लगेच रोहितला बाहेर करा, कोहलीला डच्चू द्या असं का म्हणतात? ते सध्या वाईट फॉर्ममध्ये असतील, पण त्यांना आधाराची गरज आहे. मी रोहित आणि विराटला म्हणेन, ‘माझ्या मुलांनो, मी तुमच्या सोबत आहे. चला रणजी खेळू, प्रॅक्टिस करू, धावूया, ट्रेकिंगला जाऊया.’”
धोनीबाबत बदलले सूर :
महेंद्रसिंग धोनीवर पूर्वी अनेकदा कठोर टीका करणारे योगराज सिंह यावेळी सौम्य भूमिका घेताना दिसले. ते म्हणाले, “मी धोनीला माझ्या मुलासारखं मानतो. त्याच्यावर प्रेमही आहे, पण जे चुकीचं आहे ते मी स्वीकारणार नाही. रोहित, कोहली किंवा धोनीसारखे खेळाडू हे बाहेर काढण्याचे लोक नाहीत, त्यांना पाठिंबा द्यायचा असतो.”
अर्जुन तेंडुलकरबाबत बोलताना योगराज सिंह म्हणाले, “जर त्याला मी 6 महिने प्रशिक्षण दिलं, तर तो जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज बनेल.” त्यांच्या या विधानामुळे अर्जुनच्या भविष्यातील कारकिर्दीवर नवा प्रकाश पडतोय.
कपिल देवबाबत भावनिक कबुली :
धोनीप्रमाणेच कपिल देववरही योगराज यांनी याआधी अनेकदा टीका केली आहे. मात्र या वेळी त्यांच्या सुरात भावना स्पष्ट जाणवली. “कपिलने काही चुकीचं केलं असलं तरी मी त्याच्यावर प्रेम करतो. जेव्हा मला कळलं की त्याला हार्ट अटॅक आला आहे, तेव्हा मी लगेच दिल्लीला गेलो. मी रडलो. माझ्या मुलांनी विचारलं, ‘तुम्ही एवढं का रडताय?’ मी म्हणालो, ‘तो माझा मित्र आहे, असा नाही जाऊ शकत.’ रात्रभर मी त्याला कॉल करत होतो. सकाळी कळालं की तो आता ठीक आहे,” असं योगराज म्हणाले.






