WPL 2026 Auction | महिला प्रीमियर लीग 2026 च्या मेगा ऑक्शनची आज सर्व क्रिकेटप्रेमींना उत्सुकता लागून राहिली आहे. गुरुवार, 27 नोव्हेंबर 2026 रोजी नवी दिल्ली येथे होणारा हा लिलाव अनेक खेळाडूंच्या नशिबाचा निर्णय ठरणार आहे. यंदा एकूण 277 खेळाडू ऑक्शनमध्ये उतरतील, मात्र केवळ 73 जागा उपलब्ध असल्याने स्पर्धा प्रचंड तीव्र राहणार आहे. यामध्ये 194 भारतीय तर 83 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. प्रत्येक फ्रँचायझीला किमान 15 आणि कमाल 18 खेळाडू संघात ठेवणे अनिवार्य असल्याने यंदाचा लिलाव अधिक धोरणात्मक बनला आहे. (WPL 2026 Auction)
भारताच्या विश्वविजेत्या महिला खेळाडूंना या लिलावात प्रचंड मागणी असेल, अशी अपेक्षा आहे. विशेषतः दीप्ती शर्मा ही ‘वर्ल्ड कप प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ ठरलेली ऑलराउंडर. यूपी वॉरियर्सने तिचे रिटेन्शन न केल्याने तिच्यावर अनेक franchises बोली लावण्याची शक्यता व्यक्त होत आहे. बेस प्राईस 50 लाख असून तिच्यासाठी प्रचंड चुरस दिसेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
पॉवर हिटर्स आणि तरुण खेळाडूंवर बोलीचा वर्षाव? :
40 लाखांच्या बेस प्राईसवर ऑक्शनमध्ये उतरलेली किरण नवगिरे ही या वर्षीची सर्वात मोठी आकर्षणस्थानी खेळाडू ठरणार आहे. तिच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे अनेक संघ तिच्यासाठी स्पर्धा करतील, अशी शक्यता आहे. याशिवाय 30 लाखांच्या बेस प्राईसवर वेगवान गोलंदाज क्रांती गौड, फिरकीपटू श्री चरणी आणि अनुभवी ऑलराउंडर स्नेह राणा यांच्यावरही मोठ्या बोली लागू शकतात.
तर युवा लेफ्ट-आर्म स्पिनर वैष्णवी शर्मा हिचा बेस प्राईस 10 लाख ठेवण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांत उत्तम प्रदर्शन केलेल्या या युवा खेळाडूकडेही सर्वांचे लक्ष असेल. विदेशी खेळाडूंमध्ये मेग लॅनिंग, एलिसा हीली, लॉरा वोल्वार्ट, एमेली कर आणि सोफी एक्लेस्टोन यांसारख्या सुपरस्टार्सच्या उपस्थितीमुळे ऑक्शनला अधिक रंगत येणार आहे.
WPL 2026 Auction | कोणत्या संघाकडे किती पर्स आणि किती स्लॉट्स? :
या लिलावात सर्वात जास्त पर्स यूपी वॉरियर्सकडे असून त्यांच्या खात्यात तब्बल 14.50 कोटी रुपये उपलब्ध आहेत. त्यांच्याकडे 17 स्लॉट्स रिकामे असून 6 विदेशी खेळाडूंची जागा उपलब्ध आहे. त्यामुळे यूपी वॉरियर्स हा यंदाच्या लिलावात सर्वांत आक्रमक संघ ठरू शकतो. (WPL 2026 Auction)
मुंबई इंडियन्स महत्त्वाच्या खेळाडूंसह स्थिर दिसत असले तरी त्यांच्याकडे 5.75 कोटी रुपये आणि 13 रिकामे स्लॉट्स आहेत. दिल्ली कॅपिटल्सकडे 5.70 कोटी आणि 13 स्लॉट्स, तर गुजरात जायंट्सकडे 9 कोटी आणि 16 रिकाम्या जागा आहेत. आरसीबीकडे 6.15 कोटी आणि 14 स्लॉट्स असून त्यांना 5 विदेशी खेळाडू घ्यायची संधी आहे.
पाचही संघांनी दिलेली रिटेन्शन लिस्ट पाहता अनेक मोठी नावं पुन्हा ऑक्शनमध्ये दिसणार आहेत. त्यामुळे ‘मिनी’ नव्हे तर ‘मेगा’ ऑक्शनची मजा यावेळी चाहत्यांना मिळणार आहे.






