Most Expensive Mango | उन्हाळा सुरू होताच बाजारात हापूस, पायरी, केशर यांसारख्या आंब्यांची रेलचेल पाहायला मिळते. साधारणपणे १०० ते ५०० रुपये किलो या दराने मिळणारे हे आंबेच अनेकांना महाग वाटतात. मात्र जगात असा एक आंबा आहे, ज्याची किंमत ऐकून कुणाच्याही भुवया उंचावतील. कारण या आंब्याच्या एका किलोच्या किमतीत भारतात आरामात एक सुपरबाईक किंवा सेकंड हँड कार खरेदी करता येते. हा आंबा म्हणजे जपानमधील प्रसिद्ध ‘मियाझाकी’ आंबा. (Miyazaki Mango Price)
जपानमधील मियाझाकी प्रदेशात पिकणारा हा आंबा त्याच्या खास रंग, गोड चव आणि प्रीमियम दर्जामुळे जगभर प्रसिद्ध आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या आंब्याची मागणी खूप मोठी असून त्याच्या किंमतीमुळे तो नेहमी चर्चेत असतो. अनेक ठिकाणी या आंब्याला ‘एग ऑफ द सन’ किंवा ‘सूर्यपुत्र’ असेही म्हटले जाते.
‘सूर्यपुत्र’ नावाची खास ओळख :
मियाझाकी आंब्याला जपानी भाषेत ‘ताइयो-नो-तामागो’ असे म्हणतात, ज्याचा अर्थ ‘सूर्याचे अंडे’ किंवा ‘सूर्यपुत्र’ असा होतो. या आंब्याचा रंग गडद लाल आणि जांभळट असतो, त्यामुळे तो दिसायला एखाद्या मौल्यवान रत्नासारखा वाटतो. इतर आंब्यांच्या तुलनेत त्याचा आकार मोठा आणि चव अत्यंत गोड असते. (Most Expensive Mango)
या आंब्याच्या दर्जासाठी कठोर निकष ठेवलेले असतात. साधारणपणे ३५० ग्रॅमपेक्षा जास्त वजन असलेले आणि ज्यामध्ये साखरेचे प्रमाण १५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे, अशा फळांनाच ‘मियाझाकी’ या नावाने विक्रीस परवानगी दिली जाते. त्यामुळे बाजारात उपलब्ध होणाऱ्या प्रत्येक आंब्याची गुणवत्ता उच्च दर्जाची असते.
Most Expensive Mango | इतका महाग का असतो हा आंबा? :
मियाझाकी आंब्याची लागवड अत्यंत काळजीपूर्वक केली जाते. झाडावर लागलेले प्रत्येक फळ जाळीत बांधून ठेवले जाते, जेणेकरून ते जमिनीवर पडून खराब होणार नाही. तसेच या फळांना जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळेल याची विशेष काळजी घेतली जाते. सूर्याच्या उष्णतेमुळेच त्याला त्याचा वैशिष्ट्यपूर्ण गडद लाल रंग प्राप्त होतो. (World Most Expensive Mango)
या सर्व प्रक्रियेमुळे उत्पादन कमी पण गुणवत्ता अत्यंत उच्च असते. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय बाजारात या आंब्याची किंमत प्रचंड वाढते. काही लिलावांमध्ये या आंब्याच्या एका जोडीची किंमत तब्बल २.५ ते ३ लाख रुपयांपर्यंत पोहोचल्याची उदाहरणे आहेत.
चोरी टाळण्यासाठी ‘व्हीआयपी’ सुरक्षा :
या आंब्याची किंमत प्रचंड असल्याने त्याची चोरी होण्याचा धोका देखील मोठा असतो. त्यामुळे काही शेतकरी त्यांच्या बागेत विशेष सुरक्षारक्षक किंवा बाऊन्सरही तैनात करतात. मध्य प्रदेशातील जबलपूर येथे एका शेतकऱ्याने मियाझाकी आंब्याची लागवड केल्यानंतर त्याच्या झाडांच्या सुरक्षेसाठी गार्ड आणि शिकारी कुत्रे ठेवले होते, अशी माहिती समोर आली होती.
भारतामध्येही काही हौशी शेतकरी या आंब्याची लागवड करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र जपानसारखे हवामान नसल्यामुळे त्याचे उत्पादन खूप मर्यादित राहते. त्यामुळेच मियाझाकी आंबा आजही जगातील सर्वात महाग आणि दुर्मिळ आंब्यांपैकी एक मानला जातो.






