Panipuri News | पाणीपुरी म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं, विशेषत: महिलांचा हा कायमच आवडता पदार्थ. पण हेच पाणीपुरीप्रेम एका महिलेच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आनंदात पाणीपुरी खात असताना महिलेचा जबडा अचानक इतका अडकला की तिला तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. (Panipuri News)
उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील गौरी किशनपूर काकोर येथील रहिवासी इंकला देवी कुटुंबासह जिल्हा रुग्णालयाजवळ थांबल्या होत्या. नातेवाईकांच्या प्रसूतीसाठी सर्वजण आले होते. थोडा वेळ मोकळा मिळाल्यानंतर सर्वांनी पाणीपुरी खाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार सर्वजण जवळच्या पाणीपुरीच्या गाडीकडे गेले, मात्र तिथेच धक्कादायक प्रसंग घडला.
मोठी पाणीपुरी खाण्याचा प्रयत्न; जबडा पूर्ण लॉक :
इंकला देवी यांना प्लेटमधील मोठी पाणीपुरी दिली गेली. ती तोंडात ठेवताना त्यांनी तोंड शक्य तितकं मोठं उघडलं. पण पाणीपुरी तोंडात गेल्यानंतर त्यांचा जबडा अचानक लॉक झाला आणि खाली येईनाच. त्या तोंड बंद करण्याचा वारंवार प्रयत्न करत होत्या; मात्र तोंड बंद होत नसल्याने त्यांना तीव्र वेदना जाणवत होती. (woman jaw lock)
सुरुवातीला कुटुंबीयांना हे मजाक वाटलं. सर्वजण हसत-खेळत पाणीपुरी खात होते. पण काही सेकंदातच इंकला देवी वेदनेने रडू लागल्या. परिस्थिती गंभीर होत गेली आणि त्वरित त्यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर त्यांच्या जबड्याची स्थिती अतिशय गंभीर असल्याचे आढळून आले.
Panipuri News | डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, “अशी केस आयुष्यात पहिल्यांदा पाहिली” :
जिल्हा रुग्णालयातील डॉ. मनोज कुमार यांनी सांगितलं की, इंकला देवी यांचा जबडा पूर्णपणे निखळला होता. रुग्णाचा जबडा मॅन्युअली बसवण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले. पण प्रत्येक प्रयत्न निष्फळ ठरला. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, इतक्या गंभीर स्थितीतील जबडा लॉक ही अत्यंत दुर्मिळ बाब आहे. (woman jaw lock)
शेवटी परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने इंकला देवी यांना उत्तम उपचारांसाठी सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये रेफर करण्यात आलं. तिथे तातडीची शस्त्रक्रिया करून त्यांचा जबडा योग्य ठिकाणी बसवण्यात आला. डॉक्टरांनी सांगितले की, वेळेत उपचार मिळाल्याने मोठा धोका टळला; अन्यथा गंभीर गुंतागुंत होण्याची शक्यता होती.
या धक्कादायक घटनेमुळे परिसरात मोठी चर्चा रंगली आहे. पाणीपुरीप्रेम सर्वांनाच असतं, पण अशाप्रकारे जबडा लॉक होण्याच्या घटना अत्यंत दुर्मिळ आहेत.





