Nilesh Ghaiwal Gang | पुण्यातील गुन्हेगारी जगतात कुख्यात असलेल्या निलेश घायवळ टोळीविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. कोथरूड पोलिसांनी टोळीचा सक्रीय सदस्य अजय सरोदे याला अटक केली असून, त्याच्या घरी तब्बल 400 काडतूस आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. यामध्ये 200 जिवंत तर 200 रिकाम्या पुंगळ्यांचा समावेश आहे. या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येत असून पोलिस तपासाला गती मिळाली आहे.
अजय सरोदे आणि बटर्या चौधरी या दोघांना पोलिसांनी कर्नाटकातील गाणगापूर येथून तीन दिवसांपूर्वी ताब्यात घेतले होते. अटकेनंतर झालेल्या चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार, कोथरूड पोलिसांनी सरोदेच्या घराची झडती घेतली आणि मोठ्या प्रमाणात काडतूस सापडले. त्यामुळे टोळीच्या शस्त्रसाठ्याविषयी गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. (Nilesh Ghaiwal Gang)
गोळीबाराच्या प्रकरणात सहभाग; पिस्तुली परवाना मिळाल्याची माहितीही समोर :
17 सप्टेंबरला कोथरूड भागात घायवळ टोळीने एका व्यक्तीवर गोळीबार केला होता. त्या वेळी अजय सरोदे घटनास्थळी उपस्थित असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या गुन्ह्यातही सरोदे आरोपी म्हणून समोर आला आहे. आणखी आश्चर्य म्हणजे, त्याच्याकडे अधिकृत पिस्तुली परवाना असल्याची माहिती समोर आली आहे. 29 जानेवारी 2024 रोजी पोलिसांनी त्याला हा परवाना दिला होता. परवानाधारी व्यक्तीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात काडतूस कसे आणि का साठवले गेले, याचा शोध पोलिस घेत आहेत.
या चौकशीतून घायवळ टोळीतील शस्त्रांच्या अवैध व्यवहारांची शक्यता अधिक बळकट होत आहे. अनेक गुन्ह्यांमध्ये अशा शस्त्रसाठ्याचा वापर झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे तपासयंत्रणांसमोर नव्या दिशांनी तपास वाढवण्याचे आव्हान उभे राहिले आहे.
Nilesh Ghaiwal Gang | अवैध जमीन व्यवहार, खंडणी आणि संशयास्पद आर्थिक देवाणघेवाण :
पोलीस तपासानुसार, निलेश घायवळ (Nilesh Ghaiwal Gang) याने दहशत निर्माण करून पुण्यात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर जमीन खरेदी-विक्री केली. या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची अफरातफर झाल्याचा संशय आहे. यासोबतच खंडणी उकळण्याचे अनेक प्रकार, तसेच कंपनींकडून संशयास्पद आर्थिक व्यवहार करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
या गंभीर प्रकरणांची चौकशी अधिक सखोल व्हावी म्हणून पुणे पोलिसांनी ईडीला पत्रही पाठवले आहे. आर्थिक गैरव्यवहार, मालमत्ता व्यवहार, आणि खंडणीचे व्यवहार तपासण्यासाठी स्वतंत्र तपासाची मागणी करण्यात आली आहे. घायवळ याच्यावर यापूर्वीच 45 लाख रुपयांच्या खंडणीप्रकरणी मोक्कांतर्गत गुन्हा दाखल आहे.
सध्या निलेश घायवळ टोळीवर तीन मोठे मोक्का गुन्हे दाखल आहेत. कोथरूडमधील गोळीबार, कोयत्याने हल्ला आणि कंपनीमार्फत झालेली मोठ्या प्रमाणावरील आर्थिक देवाणघेवाण या तिन्ही प्रकरणांत मोक्का अंतर्गत कारवाई झालेली आहे. पोलिसांचा तपास आता गतिमान असून आणखी महत्त्वाचे तपशील समोर येण्याची शक्यता आहे.






