Vikas Gogawale | राज्याचे मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांचे पुत्र तसेच शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेना कोअर कमिटीचे सदस्य विकास गोगावले (Vikas Gogawale) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. महाड नगरपालिका निवडणुकीदरम्यान मतदानाच्या दिवशी घडलेल्या मारहाणीच्या प्रकरणात न्यायालयाने विकास गोगावले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सलग तीन वेळा फेटाळल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आता पुढील कारवाई काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Vikas Gogawale Arrest)
महाड नगरपरिषद निवडणूक काळात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले होते. या राजकीय संघर्षाचे रूपांतर थेट रस्त्यावरच्या वादात झाले असून, मतदानाच्या दिवशी घडलेल्या घटनेमुळे परिस्थिती चांगलीच तापली होती. या पार्श्वभूमीवर विकास गोगावले यांच्याविरोधात दाखल गुन्ह्यांमुळे त्यांची कायदेशीर कोंडी वाढत चालली आहे.
अटकपूर्व जामीन तीन वेळा फेटाळला :
महाड नगरपरिषदेतील (Mahad Nagarparishad) प्रभाग क्रमांक २ मध्ये मतदानाच्या दिवशी झालेल्या राडा प्रकरणी माणगाव न्यायालयाने दोन वेळा विकास गोगावले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र तिथेही त्यांना दिलासा मिळालेला नाही. सलग तीन वेळा जामीन फेटाळल्यामुळे आता पोलिसांकडून थेट अटकेची कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जर विकास गोगावले यांना अटक झाली, तर हा प्रकार मंत्री भरत गोगावलेंसाठी (Bharat Gogawale) मोठा राजकीय धक्का ठरणार असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून शिवसेना शिंदे गटासाठीही ही बाब अडचणीची ठरू शकते.
Vikas Gogawale | मतदानाच्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? :
महाड नगरपालिका निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला होता. या वादाचे रूपांतर मारहाण, वाहनांची तोडफोड आणि शस्त्र बाळगण्यापर्यंत गेले होते. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, विकास गोगावले यांच्यासह दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांविरोधात महाड पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
दरम्यान, या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचेही अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले आहेत. यामध्ये माजी आमदार माणिकराव जगताप यांचे बंधू हणमंत जगताप आणि सुशांत जाबरे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांचा समावेश असल्याची माहिती आहे. या सर्व घडामोडींमुळे महाडमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






