राष्ट्रवादीचं नेतृत्व कुणाकडे? सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर प्रफुल पटेलांचा सर्वात मोठा खुलासा

On: February 3, 2026 2:10 PM
Praful Patel
---Advertisement---

Praful Patel | अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही भावनिक वातावरण आहे. बारामती येथे अंत्यसंस्कार झाल्यानंतर अजित पवारांचे अस्थीकलश विविध जिल्ह्यांत पाठवण्यात आले असून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. अशा पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांना घाईघाईत शपथ का दिली आणि आता राष्ट्रवादीचं नेतृत्व कुणाकडे असेल, या प्रश्नांवर पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.

प्रफुल पटेल (Praful Patel News) यांनी सांगितले की, अजित पवार यांच्या पश्चात पक्षातील सर्व नेते आणि कार्यकर्त्यांची एकमताने मागणी होती की सुनेत्रा पवार यांनीच पुढील नेतृत्व स्वीकारावे. पवार कुटुंबाची परंपरा तीन दिवस शोक पाळण्याची असून त्यानंतरच चौथ्या दिवशी शपथविधी पार पाडण्यात आला. त्यामुळे हा निर्णय घाईघाईचा नव्हता, तर परंपरेनुसार आणि परिस्थिती लक्षात घेऊन घेतलेला होता, असेही त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या केंद्रीय कार्यालयात अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करताना त्यांनी ही भूमिका मांडली.

अजित दादांच्या आठवणींना उजाळा :

प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी अजित पवारांसोबतचा आपला दीर्घ राजकीय प्रवास आठवताना सांगितले की, “1991 साली आम्ही दोघे एकत्र राजकारणात उतरलो. गेली अनेक वर्षं आम्ही खांद्याला खांदा लावून काम केलं. मात्र आज अजित दादा आपल्यात नाहीत, यावर अजूनही विश्वास बसत नाही.” त्यांनी सांगितले की, अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी दोघांमध्ये संवाद झाला होता आणि झेडपी निवडणुकांच्या तयारीवर चर्चा झाली होती. त्या भेटीत अजित पवारांनी “आता काही दिवस दौऱ्यावर असेन, पुन्हा भेट होईल,” असे म्हटले होते, मात्र तीच त्यांची शेवटची भेट ठरली, अशी भावनिक आठवण त्यांनी सांगितली.

त्यांनी पुढे सांगितले की, अजित पवारांनी आपल्या आयुष्यात आलेले अनेक चढ-उतार धैर्याने पार केले. 2023 मध्ये पक्षाने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांमध्येही ते ठामपणे उभे राहिले. पुढील काळातही अजित पवारांची काम करण्याची पद्धत, त्यांची कार्यसंस्कृती आणि जनतेशी असलेला संवाद तसाच पुढे चालू ठेवण्याचा निर्धार पक्षाने केला आहे. काम करत राहणे, पुढे जाणे आणि दिलेली वचने पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केले.

Praful Patel | दशक्रिया विधी आधीच पार पडल्याची माहिती :

दरम्यान, अजित पवार (Ajit Pawar) यांचे 28 जानेवारी रोजी बारामती येथे विमान अपघातात निधन झाले होते. पारंपरिक रितीनुसार त्यांचा दशक्रिया विधी 6 फेब्रुवारीला होणे अपेक्षित होते. मात्र, तो विधी आधीच पार पडल्याची माहिती त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी प्रसारमाध्यमांना दिली. त्यामुळे पुढे कोणतेही अंत्यविधी किंवा धार्मिक विधी होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुढील दिशा सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली ठरेल, हे प्रफुल पटेल यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले असून पक्ष एकजुटीने अजित पवारांचा वारसा पुढे नेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

News Title: Why Sunetra Pawar Took Oath in Hurry? Praful Patel Clarifies NCP Leadership After Ajit Pawar’s Death

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now