CSK trade Samson | IPL 2026 ट्रेड विंडोतली सर्वात मोठी आणि चर्चेत असलेली डील अखेर पूर्ण झाली आहे. चेन्नई सुपर किंग्सने (CSK) त्यांच्या संघातील दोन महत्त्वाचे खेळाडू रविंद्र जडेजा (Ravindra jadeja) आणि सॅम करन यांना राजस्थान रॉयल्सकडे ट्रेड केले आहे आणि त्याच्या बदल्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन चेन्नईकडे दाखल झाला आहे. या भव्य आणि धक्कादायक ट्रेडमुळे क्रिकेट जगतात प्रचंड चर्चा रंगल्या आहेत.
CSK फॅन्ससाठी ही बातमी भावनिक ठरली आहे. कारण जडेजा तब्बल 11 सिझनपासून या पिवळ्या आर्मीचा अविभाज्य भाग आहे. IPL 2023 च्या फायनलमध्ये शेवटच्या दोन चेंडूंमध्ये केलेल्या जडेजाच्या कमालीच्या फटक्यांमुळे सीएसकेला पाचवं विजेतेपद मिळालं होतं. त्यामुळे त्याला सोडण्याचा निर्णय का घ्यावा लागला, याविषयी सर्वांच्या मनात प्रश्न होता. त्याचं उत्तर CSK व्यवस्थापकीय संचालक काशी विश्वनाथ यांनी दिलं.
जडेजाला का सोडलं? :
काशी विश्वनाथ यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, जडेजाला संघातून सोडण्याचा निर्णय CSK साठी भावनिकदृष्ट्या अत्यंत कठीण होता. फॅन्समध्येही प्रचंड नाराजी दिसून आली आहे. पण संघाच्या सध्याच्या स्थितीचा आणि भविष्यातील गरजांचा विचार करून काही मोठे बदल करणे आवश्यक होते, असं त्यांनी सांगितलं.
त्यांनी स्पष्ट केलं की हा ट्रेड परस्पर संमतीने झालेला आहे. जडेजासह चर्चा करण्यात आली तेव्हा त्यानं सांगितलं की व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये आता थोडा ब्रेक घ्यायचा आहे. दुसरीकडे सीएसकेच्या काही अनुभवी खेळाडूंची कारकीर्द अंतिम टप्प्यात आहे. म्हणून पुढील काही वर्षांसाठी नवीन टीम स्ट्रक्चर उभं करणं गरजेचं होतं. जडेजासारख्या ऑलराऊंडरला रिप्लेस करणे अवघड असलं तरी तरुण खेळाडूंवर भर देऊन ही कमतरता भरून काढण्याचा विश्वास CSK ने व्यक्त केला.
CSK trade Samson | संजू सॅमसनलाच का निवडलं? :
CSK ला सध्या टॉप ऑर्डरमधील एक दर्जेदार भारतीय बॅटरची स्पष्ट कमतरता भासत होती. या वर्षीच्या मिनी ऑक्शनमध्ये उच्च दर्जाचे भारतीय टॉप-ऑर्डर फलंदाज मोठ्या प्रमाणावर उपलब्ध नसतील, याचा अंदाज टीम मॅनेजमेंटनं घेतला. त्यामुळे ट्रेड विंडोच सर्वात उत्तम पर्याय ठरला. (CSK trade Samson)
संजू सॅमसनविषयी (Sanju Samson) काशी विश्वनाथ म्हणाले की, “संजू (Sanju Samson) हा IPL मधील सर्वात अनुभवी आणि सातत्याने रन करणाऱ्या फलंदाजांपैकी एक आहे. त्याने 4,500 हून अधिक आयपीएल धावा केल्या आहेत, आणि राजस्थान रॉयल्सचे यशस्वी नेतृत्व केले आहे.” त्याचे वय फक्त 30 वर्षे असल्यामुळे पुढील अनेक वर्षे CSK ची मध्यवर्ती ताकद म्हणून तो संघाला स्थिरता देऊ शकतो, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
RR संघही प्रचंड बळकट होणार :
चेन्नईने फक्त जडेजाच नव्हे तर सॅम करनलाही ट्रेड केलं. करनने 2020, 2021 आणि 2025 मध्ये CSK साठी प्रभावी कामगिरी केली होती. पण भविष्यातील संघरचनेत बदल करण्याच्या धोरणामुळे हा निर्णय घ्यावा लागला असल्याचं सांगण्यात आलं.
संजू सॅमसनच्या येण्याने CSK ला एक अनुभवी भारतीय बल्लेबाज, नेतृत्वाची भर आणि टॉप ऑर्डरमध्ये स्थिरता मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे जडेजा पुन्हा राजस्थान रॉयल्सकडे परतल्याने RR संघही प्रचंड बळकट होणार आहे. IPL 2026 चा सीझन या डीलमुळे अधिक रोचक आणि ऐतिहासिक ठरणार यात शंका नाही.






