Weather Update | सध्या राज्यात एकीकडे उष्णतेची तीव्र लाट जाणवते आहे. विशेषतः विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर गेले असून, रस्त्यांवर सन्नाटा पसरलेला आहे. उन्हाच्या कडाक्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशातच हवामान विभागाने पावसाचा इशारा दिल्याने राज्यावर दुहेरी संकट ओढवलं आहे.
कोकण व मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट-
हवामान खात्याच्या (IMD) अंदाजानुसार, येत्या २४ तासांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्याला विशेषतः वादळासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर सातारा, धाराशिव, लातूर, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्यानुसार (Weather Update) , सध्या केरळपासून ते महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे केवळ महाराष्ट्रच नव्हे तर इतरही अनेक राज्यांमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
शेतकऱ्यांवर मोठा परिणाम?
राज्यात ज्या वेगाने उष्णतेची लाट आली आहे, त्याच वेगाने आता पावसाचाही धोका वाढला आहे. उन्हामुळे आधीच शेतकरी संकटात असताना, अवकाळी पावसामुळे त्यांच्या पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. हवामानातील या अचानक बदलामुळे शेतीव्यवस्था अधिक धोक्यात येऊ शकते.
राज्यातील हवामानातील या स्थितीमुळे प्रशासनही सतर्क झालं आहे. पावसाचा धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनांनी तयारी ठेवावी, असंही सूचित करण्यात आलं आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि हवामान खात्याच्या सूचनांचं पालन करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.






