‘एल निनो’चे सावट आणि पावसाची प्रतीक्षा; हवामान विभागाची महत्त्वाची अपडेट समोर

On: July 16, 2026 12:19 PM
Maharashtra Rain Alert
---Advertisement---

Weather Update | राज्यात बदलत्या हवामानासह ‘एल निनो’च्या प्रभावामुळे पावसातील अनियमितता वाढली असून, खरीप हंगामातील पिकांबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. अनेक भागांत अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने पेरण्या रखडल्या आहेत, तर काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्यातील पावसाची स्थिती आणि खरीप पेरणीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

भरणे म्हणाले की, राज्यात काही भागांत मुसळधार पाऊस झाला असला तरी विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक भागांत अद्याप पावसाची कमतरता आहे. त्यामुळे खरीप हंगामावर त्याचा परिणाम होत आहे.

राज्यात 70 टक्के खरीप पेरणी पूर्ण

कृषिमंत्र्यांनी सांगितले की, राज्यात आतापर्यंत सुमारे 70 टक्के खरीप पेरणी पूर्ण झाली असून, 30 टक्के पेरणी अद्याप बाकी आहे. काही भागांत पुरेसा वाफसा नसल्याने पेरणी झालेली नाही, तर काही ठिकाणी पेरलेले बियाणे उगवलेले नाही.

त्यांच्या म्हणण्यानुसार, हवामान विभागाच्या अंदाजानुसार जुलैअखेरीस विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे उर्वरित पेरण्या पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

‘एल निनो’चा परिणाम 

दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्रावर एल निनोचा परिणाम जाणवत असून, त्याचा सामना करावा लागणार आहे. बदलत्या हवामानामुळे पावसाचा पॅटर्न बदलला असून, शेतीवर त्याचा थेट परिणाम होत आहे.

कुठे सर्वाधिक, कुठे सर्वात कमी पेरणी?

कृषिमंत्र्यांच्या माहितीनुसार:

अमरावती विभागात सर्वाधिक 86 ते 90 टक्के पेरणी पूर्ण झाली आहे.
ठाणे विभागात सर्वात कमी पेरणी झाली आहे.
कोकणात सर्वाधिक पाऊस, तर नागपूर विभागात सर्वात कमी पाऊस नोंदवला गेला आहे.
नंदूरबार जिल्ह्यातील नंदूरबार, शहादा, तळोदा आणि अक्राणी या तालुक्यांमध्येही पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले आहे.
सोयाबीन उत्पादकांनाही फटका

यंदा अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र, काही भागांत बियाणे उगवले नसल्याने सुमारे 10 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना फटका बसला असल्याची माहितीही कृषिमंत्र्यांनी दिली.

दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार जुलैच्या अखेरीस राज्यातील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

News Title: Weather Update El Nino Threat On Maharashtra Agriculture 

Join WhatsApp Group

Join Now