Walmik Karad | मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh murder) यांच्या निर्घृण हत्येला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या प्रकरणाने राज्याला हादरवून सोडले होते. अपहरणानंतर अमानुषपणे हत्या झाल्याचे व्हिडिओ आणि फोटो समोर येताच नागरिक संतप्त झाले. एक वर्षानंतरही काही मुद्दे अनुत्तरित असल्याने संतोष देशमुख कुटुंबाच्या वेदना आजही ताज्याच आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यस्मरण कार्यक्रमात मोठ्या नेत्यांनी हजेरी लावली आणि आरोपींविरोधात कडक भूमिका मांडली.
या प्रकरणातील प्रमुख आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरारच आहे. इतर आरोपींना अटक झाली असली, तरी कृष्णा आंधळे पळून जाऊन पोलिसांना चकवत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तो नक्की कुठे आहे आणि जिवंत आहे की नाही, याबाबतही आता शंका निर्माण होत आहे. या सर्व घडामोडींमुळे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.
वाल्मिक कराडला फाशी होईपर्यंतपर्यंत शांत बसणार नाही – संदीप क्षीरसागर :
पुण्यस्मरण सोहळ्यात राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandip kshirsagar) यांनी मोठे विधान केले. “वाल्मिक कराडला फाशीची शिक्षा होईपर्यंत आपण शांत बसणार नाही,” असे ते म्हणाले. तसेच कराडचा सीडीआर काढण्याची मागणी त्यांनी पुन्हा केली. सीडीआर मिळाल्यास त्याला कोणी मदत केली, कोणाशी संपर्क साधला याविषयीची महत्त्वाची माहिती समोर येईल, असे क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.
देशमुख कुटुंबाच्या डोळ्यात आजही अश्रू आहेत आणि न्याय न मिळाल्याची तीव्र वेदना त्यांना दररोज भासते, असे क्षीरसागर यांनी सांगितले. सुरुवातीपासूनच ते देशमुख कुटुंबाच्या पाठीशी असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले.
Walmik Karad | कृष्णा आंधळे अजून जिवंत आहे का? संशय व्यक्त :
या प्रकरणात कृष्णा आंधळेबाबत (Krishna andhale) अनेक अफवा पसरल्या होत्या. कधी नाशिकमध्ये, तर कधी पुण्यात दिसल्याच्या चर्चा झाल्या. परंतु प्रत्यक्षात पोलिसांच्या हाती तो अद्याप लागलेला नाही. एका वर्षानंतरही त्याचा ठावठिकाणा समजू न शकल्याने तो जिवंत आहे का याबाबत आमदार क्षीरसागर यांनी सरळ प्रश्नच उपस्थित केला.
फरार आरोपीने पोलिस यंत्रणेलाच खुले आव्हान दिल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. पोलिसांच्या तपासावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे स्थानिक पातळीवर दिसून येत आहे.






