Vignesh Puthur | IPL 2025 च्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सने जरी पहिल्या सामन्यात पराभव पत्करला असला, तरी त्यात एक नव्या स्टारचा उदय झाला. विग्नेश पुतुर या युवा फिरकीपटूने आपल्या पहिल्याच IPL सामन्यात धमाकेदार कामगिरी करत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. त्याची पार्श्वभूमी आणि जिद्दीचा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे.
डेब्यूत 3 विकेट्स, चेन्नईला टेन्शनमध्ये टाकलं
चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध सामन्यात मुंबई इंडियन्सकडून पदार्पण करणाऱ्या विग्नेश पुतुर (Vignesh Puthur) या 24 वर्षीय डावखुऱ्या लेग स्पिनरने आपली छाप सोडली. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून रोहित शर्माच्या जागी मैदानात उतरवलेल्या विग्नेशने 3 ओव्हरमध्ये 3 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या आणि चेन्नईच्या फलंदाजांना अडचणीत टाकलं.
त्याने ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad), शिवम दुबे आणि दीपक हुड्डा यांना माघारी धाडून मोठं योगदान दिलं. ऋतुराजचा कैच विल जॅक्सने घेतला, दुबे लॉन्ग-ऑनवर तिलक वर्माला झेल देऊन बाद झाला, आणि हुड्डाला चकवत तिसरी विकेट मिळवली. विग्नेशने एकूण 4 ओव्हरमध्ये 32 धावा देत 3 विकेट घेतल्या आणि सर्वत्र कौतुकाचं केंद्र बनला.
साधं घर, मोठं स्वप्न – विग्नेशचा संघर्षमय प्रवास
केरळमधील एका अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या विग्नेशचे वडील ऑटोरिक्षा चालक आहेत. घराच्या गरजा भागवत त्याने क्रिकेटमधील स्वप्न जपलं. सुरुवातीला लेफ्ट आर्म पेसर म्हणून खेळणाऱ्या विग्नेशला स्थानिक खेळाडू मोहम्मद शेरिफने स्पिनर होण्याचा सल्ला दिला आणि त्याने तो मार्ग स्वीकारला.
त्रिशूर येथील सेंट थॉमस कॉलेजमध्ये तो खेळत असताना त्याने केरळ कॉलेज प्रीमियर लीगमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केलं. त्यानंतर जॉली रोवर्स क्लबसाठी खेळला आणि एलेप्पी रिपल्सकडून केसीएलमध्ये प्रभावी कामगिरी केली.
अखेर मुंबई इंडियन्सने त्याला 30 लाख रुपयांना विकत घेतलं आणि SA20 लीगमधील MI केपटाऊन टीमसोबत ट्रेनिंगसाठी दक्षिण आफ्रिकेला पाठवलं. केरळच्या सीनियर संघाकडून अजूनही त्याने डेब्यू केलेला नसतानाही IPL मध्ये खेळण्याची संधी त्याच्या जिद्दीचे फलित आहे.
Title : Vignesh Puthur Shines in IPL Debut for MI






