Maharashtra Kesari 2025 | माढा तालुक्यातील बेंबळे गावातील सुपुत्र वेताळ शेळके याने महाराष्ट्र केसरी 2025 चा किताब पटकावल्यावर संपूर्ण गावात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. अहिल्यानगर येथे पार पडलेल्या स्पर्धेच्या निकालानंतर गुढीपाडव्याच्या दिवशीच गावकऱ्यांनी दिवाळी साजरी करत फटाके फोडून आनंद व्यक्त केला. (Maharashtra Kesari 2025 )
मातीवर झुंज देणाऱ्या शेळकेचा गौरवपूर्ण विजय
कर्जत-जामखेड (Karjat Jamkhed) येथे झालेल्या 66व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत वेताळ उर्फ दादा शेळके आणि पृथ्वीराज पाटील यांच्यात घमासान सामना रंगला. शेळकेने कुशल तंत्र आणि दमदार ताकदीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्याला चीत करत महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला. त्याच्या या विजयाने गावात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले.
वेताळची आई केशर बाई शेळके (Keshar Bai Shelke) या घरात देवघरासमोर बसून मोबाईलवर आपल्या मुलाची झुंज पाहत होत्या. मुलाने मिळवलेल्या ऐतिहासिक यशाने त्या भावूक झाल्या. त्यांनी सांगितले की, बाळूमामा आणि विठुरायाच्या आशीर्वादामुळेच माझ्या मुलाला हे यश लाभले. कष्टात वाढवलेल्या मुलाने संपूर्ण महाराष्ट्राचे नाव उंचावले, याचा अभिमान संपूर्ण कुटुंबाला वाटत आहे.
गावात विजयाचा जल्लोष साजरा
शेळकेच्या विजयाची बातमी कळताच बेंबळे (Bembale) गावात गुढीपाडव्याला दिवाळीचे स्वरूप आले. फटाक्यांची आतषबाजी, शुभेच्छांचा वर्षाव आणि ढोल-ताशांच्या गजरात दादा शेळके याचा सन्मान करण्यात आला. गावातील लहानथोर, महिला, वृद्ध साऱ्यांनी मिळून पैलवानाचा उत्सव साजरा केला.
वेताळ शेळके हा मूळचा माढा तालुक्यातील बादलेवाडी (Badalewadi) येथील असून, सध्या बेंबळे येथे वास्तव्यास आहे. माती कुस्तीतून त्याने आपले कौशल्य सिद्ध केले असून, आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल पुणे (Pune) येथे त्याचे प्रशिक्षण झाले आहे. त्याचे प्रशिक्षक काका पवार (Kaka Pawar) यांनी त्याला मार्गदर्शन केले. वेताळने याआधीही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. मॅटवर सीनियर नॅशनल कुस्ती स्पर्धेत पदक जिंकण्यासोबतच आशियाई आणि जागतिक कुस्ती स्पर्धांमध्येही त्याने सहभाग घेतला आहे.
Title : Vetal Shelke Crowned Maharashtra Kesari 2025






