Uddhav Thackeray | राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, नगर परिषद, नगर पंचायत आणि महापालिकांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. या निवडणुकांमध्ये शिवसेना ठाकरे गटाला अपेक्षित यश मिळालं नाही, तर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने अनेक ठिकाणी चांगली कामगिरी केली. अशातच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे.
निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार येत्या ५ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितींसाठी मतदान होणार असून, ७ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. मात्र त्याआधीच सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक मोठी राजकीय घडामोड समोर आली असून, भाजप नेते आणि पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवलीत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
कणकवलीत ठाकरे गटाला दुहेरी धक्का :
महापालिका निवडणुकांप्रमाणेच आता जिल्हा परिषद (ZP Election) आणि पंचायत समिती निवडणुकांमध्येही अनेक ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडून येत असल्याचं चित्र दिसून येत आहे. याआधी ठाकरे गट आणि मनसेच्या उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे भाजप आणि शिंदे गटाला मोठा फायदा झाला होता. अशाच प्रकाराची पुनरावृत्ती आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत असल्याचं स्पष्ट होत आहे.
कणकवली तालुक्यातील वरवडे पंचायत समिती मतदारसंघातून भाजपचे सोनू सावंत (Sonu Sawant) हे बिनविरोध निवडून आले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुधीर सावंत आणि मनसेचे उमेदवार शांताराम साद्ये यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे भाजपचा विजय सोपा झाला. या घडामोडीमुळे ठाकरे गटाला हा दुसरा मोठा धक्का मानला जात असून, स्थानिक राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
Uddhav Thackeray | नितेश राणेंचा जिल्ह्यात दबदबा वाढतोय :
पालकमंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपची बिनविरोध विजयाची मालिका सुरू असल्याचं चित्र आहे. आतापर्यंत जिल्ह्यात भाजपचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, यामुळे भाजपची ताकद अधिक वाढल्याचं मानलं जात आहे. याचा थेट परिणाम ठाकरे गटाच्या संघटनात्मक ताकदीवर होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
या घडामोडींमुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका अधिक आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या वाढत्या प्रभावामुळे ठाकरे गटाची रणनीती काय असणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड राज्याच्या राजकारणात महत्त्वाची मानली जात आहे.






