तिलक वर्माने त्याच्या आजारपणाबद्दल केला सर्वात मोठा खुलासा!

On: October 24, 2025 10:56 AM
Tilak Varma
---Advertisement---

Tilak Varma | अलिकडील आशिया कप 2025 च्या फायनल सामन्यात भारताच्या विजयाचा हिरो ठरलेला तिलक वर्मा (Tilak varma) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आपल्या करिअरमधील सर्वात कठीण क्षण उलगडताना त्याने आयुष्य बदलवून टाकणारा अनुभव सांगितला. तिलक वर्माने सांगितलं की, तीन वर्षांपूर्वी म्हणजेच 2022 मध्ये तो एक जीवघेण्या आजाराशी लढत होता.

त्या काळात तो इंडिया ‘ए’ संघातून बांग्लादेशविरुद्ध सीरिज खेळत होता. त्यावेळी मैदानावर असतानाच त्याची तब्येत अचानक बिघडली. “मी फलंदाजी करत होतो, पण अचानक शरीर दगडासारखं वाटायला लागलं, बोटं काम करणं बंद झालं आणि डोळे फिरायला लागले,” असं तिलकने सांगितलं. त्यावेळी त्याला रबडोमायोलिसिस (Rhabdomyolysis) नावाच्या गंभीर आजाराने ग्रासलं होतं.

हातातील ग्लोव्हज कापून काढावे लागले :

तिलक वर्मा पुढे म्हणाला की, “मी शतकाच्या दिशेने खेळत होतो, पण माझं शरीर पूर्णपणे आकडून गेलं. मला रिटायर हर्ट व्हावं लागलं. तेव्हा माझे हात इतके आकडले की, ग्लोव्हज कापून काढावे लागले.” हा क्षण तिलकसाठी अत्यंत भयावह ठरला. त्या आजारात शरीरातील स्नायू तुटण्यास सुरुवात होते आणि रक्तात मायोग्लोबिन नावाचं रसायन मिसळतं, ज्यामुळे किडनीचं नुकसान होऊ शकतं.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जर थोडा आणखी उशीर झाला असता, तर तिलकचा जीवही गेला असता. मात्र योग्य वेळी वैद्यकीय मदत मिळाल्याने तो आज पुन्हा मैदानावर धावतोय. त्या प्रसंगाची आठवण करताना तिलक म्हणतो, “मी माझ्या दुसऱ्या आयुष्याबद्दल आभारी आहे.”

Tilak Varma | आकाश अंबानी आणि जय शाह यांच्या प्रयत्नांनी वाचला जीव :

तिलक वर्माने सांगितलं की, त्या कठीण काळात आकाश अंबानी (Akash Ambani) आणि जय शाह (Jay Shah) यांनी त्याच्या जीव वाचवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. “माझ्या तब्येतीबाबत समजताच आकाश अंबानी यांनी लगेच जय शाह यांच्याशी संपर्क साधला. दोघांच्या प्रयत्नाने मला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं,” असं तिलकने सांगितलं. त्याने दोघांचे विशेष आभारही मानले. (Tilak Varma News)

आज तिलक वर्मा पुन्हा एकदा भारतीय संघाचा विश्वासू मधल्या फळीतील फलंदाज म्हणून नावारूपास आला आहे. मात्र त्याच्या या यशामागे एका प्राणांतिक आजारावर केलेलं धैर्य, वैद्यकीय उपचार आणि योग्य वेळेवर घेतलेले निर्णय हे घटक निर्णायक ठरले आहेत.

News Title: Tilak Varma reveals his near-death experience with Rhabdomyolysis – had to cut off gloves during match

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now