अजितदादांच्या अंत्यविधीवेळी बारामतीत नेमकं काय घडलं? ‘त्या’ संतापजनक कृत्यामुळे मोठी खळबळ!

On: February 2, 2026 12:27 PM
Baramati News
---Advertisement---

Baramati News | अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनामुळे महाराष्ट्रभर शोककळा पसरलेली असतानाच बारामती (Baramati) येथे अंत्यसंस्कारावेळी संतापजनक घटना घडली. शोकाकुल वातावरणात जमलेल्या हजारो नागरिकांच्या गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी मोठ्या प्रमाणावर दागिने लंपास केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

अंत्यसंस्काराच्या गर्दीत चोरट्यांचा डाव :

अजित पवार यांच्यावर बारामतीतील विद्या प्रतिष्ठान (Vidya Pratishthan) मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. महाराष्ट्राच्या विविध भागांतून लाखो नागरिक आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी दाखल झाले होते. या भावनिक वातावरणात गर्दीचा फायदा घेत चोरट्यांच्या टोळीने तब्बल १५ जणांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून पळ काढला. चोरी गेलेल्या दागिन्यांची अंदाजे किंमत २५ ते ३० लाख रुपये इतकी असल्याची माहिती समोर आली आहे.

२८ जानेवारी रोजी विमान अपघातात अजित पवार यांचं निधन झालं, तर दुसऱ्या दिवशी २९ जानेवारीला त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या काळात नागरिक अत्यंत दुःखी आणि भावनाविवश असताना चोरट्यांनी इतक्या निर्ढावपणे हातसफाई केल्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली. काही नागरिकांनी या प्रकारानंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.

Baramati News | कडक बंदोबस्त असूनही चोरी, आरोपी ताब्यात :

अंत्यविधीच्या पार्श्वभूमीवर बारामती शहरात जवळपास ८ हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात असतानाही चोरट्यांनी मोठ्या प्रमाणावर चोरी केल्याने पोलिस यंत्रणेची परीक्षा झाल्याचं चित्र आहे. मात्र, गर्दीत काही संशयितांना नागरिकांनी सतर्कतेने पकडून त्यांना मारहाण करत पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती मिळाली आहे.

या घटनेनंतर पीडितांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या असून, पोलिसांनी मोहम्मद युनूस (Mohammed Yunus), राजकुमार आठवले (Rajkumar Aathvale), एजाज मिरावले (Ejaz Mirawale), मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) आणि बाळू बोत्रे (Balu Botre) यांच्यासह अन्य दोन साथीदारांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

सध्या आरोपींची कसून चौकशी सुरू असून, या चोरीमागे आंतरराज्यीय टोळीचा हात असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा संवेदनशील प्रसंगी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण बारामतीत संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, चोरी गेलेला ऐवज लवकरात लवकर परत मिळावा आणि मुख्य सूत्रधारांना अटक व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

News Title: Theft During Ajit Pawar Funeral

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now