James Ransone Death | हॉलिवूड सिनेसृष्टीतून एक धक्कादायक आणि दु:खद बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अमेरिकन अभिनेते आणि ‘द वायर’ या गाजलेल्या मालिकेमुळे ओळख मिळवलेले जेम्स रॅन्सोन यांचे वयाच्या 46व्या वर्षी निधन झाले आहे. या घटनेनंतर आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि टेलिव्हिजन विश्वात शोककळा पसरली असून चाहत्यांसह कलाकारांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
लॉस एंजेलिस काउंटी मेडिकल एक्झामिनरच्या माहितीनुसार, शुक्रवारी जेम्स रॅन्सोन यांचा मृत्यू झाला. ते त्यांच्या घरी मृतावस्थेत आढळून आले. मृत्यूमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नसून तपास सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या अचानक जाण्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
‘द वायर’मधील भूमिकेमुळे मिळाली जागतिक ओळख :
जेम्स रॅन्सोन यांनी एचबीओच्या आयकॉनिक क्राइम ड्रामा मालिका ‘द वायर’च्या दुसऱ्या सिझनमध्ये झिग्गी सोबोटका ही भूमिका साकारली होती. गुन्हेगारी जगतात अडकलेल्या एका डॉक वर्करचं वास्तव त्यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडलं होतं. त्यांच्या अभिनयाचं समीक्षकांनी तसेच प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणावर कौतुक केलं होतं. याच भूमिकेमुळे त्यांना टेलिव्हिजन विश्वात वेगळी ओळख मिळाली.
यानंतर त्यांनी ‘जनरेशन किल’ या मिनीसीरिजमध्ये कॉर्पोरल जोश रे पर्सनची भूमिका साकारत पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची छाप सोडली. या मालिकेत त्यांनी अलेक्झांडर स्कार्सगार्ड यांच्यासह काम केलं होतं. दोन दशकांहून अधिक काळ त्यांनी मालिका आणि चित्रपटांमध्ये सातत्याने काम करत आपली कारकीर्द घडवली.
James Ransone Death | दोन दशकांची कारकीर्द, शेवटचा चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित :
जेम्स रॅन्सोन यांचा जन्म 1979 साली बाल्टिमोर येथे झाला होता. त्यांनी आर्ट स्कूलमधून शिक्षण घेतल्यानंतर 2000 च्या दशकात अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. ‘द वायर’नंतर ‘बॉश’, ‘पोकर फेस’ आणि ‘मोजेक’ यांसारख्या मालिकांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या.
त्यांनी अनेक हॉरर चित्रपटांमध्येही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. ‘ब्लॅक फोन 2’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला असून तो ऑक्टोबर 2025 मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसला, तरी रॅन्सोन यांची भूमिका दमदार असल्याचं मत व्यक्त केलं जात होतं. (James Ransone Death)
दरम्यान, जेम्स रॅन्सोन यांच्या मृत्यूमागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत. त्यांच्या निधनामुळे हॉलिवूडमधील एक संवेदनशील आणि प्रतिभावान अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला आहे.






