Thane water cut | ठाणेकरांसाठी पाणीपुरवठ्याबाबत महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिका (Thane Municipal Corporation) ने शुक्रवार, 30 जानेवारी 2026 रोजी काही भागांत पाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य जलवाहिनीवरील दुरुस्ती कामासाठी हा शटडाऊन असून नागरिकांनी आधीच पाण्याचा साठा करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दुरुस्ती कामासाठी महापालिकेचा निर्णय
महापालिकेच्या माहितीनुसार, पालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतील किरवली (Kirwali) येथील मुख्य जलवाहिनीला गळती लागली आहे. ही गळती तातडीने थांबवण्यासाठी आवश्यक दुरुस्ती करण्यात येणार असून, त्याचवेळी इंदिरानगर (Indiranagar) येथील संपची साफसफाई करण्याचं कामही नियोजित आहे. या दोन्ही कामांसाठी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवावा लागणार असल्याचं पालिकेने स्पष्ट केलं आहे.
या कारणामुळे शुक्रवार, 30 जानेवारी रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत म्हणजेच एकूण सहा तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. याचा थेट परिणाम घोडबंदर रोड (Ghodbunder Road) ते किसननगर (Kisannagar) दरम्यानच्या विविध भागांवर होणार असून नागरिकांनी याची पूर्वतयारी करून ठेवावी, असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलं आहे.
Thane water cut | कोणते भाग राहणार पाण्याविना :
या शटडाऊन काळात वर्तकनगर (Vartaknagar), ऋतुपार्क (Ritu Park), जेल परिसर (Jail Area), गांधीनगर (Gandhinagar), रुस्तमजी (Rustamji), सिद्धांचल (Siddhanchal), समतानगर (Samatanagar), सिद्धेश्वर (Siddheshwar), इटर्निटी (Eternity), जॉन्सन (Johnson), इंदिरानगर, श्रीनगर (Shrinagar), लोकमान्यनगर (Lokmanya Nagar), सावरकरनगर (Savarkar Nagar), रुपादेवी पाडा (Rupadevi Pada) आणि किसननगर या भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे.
महापालिकेने हेही स्पष्ट केलं आहे की, जलवाहिनी रिकामी झाल्यामुळे पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्यानंतर दाब पूर्ववत होण्यास वेळ लागू शकतो. त्यामुळे शनिवार आणि रविवार या पुढील एक ते दोन दिवसांत संबंधित भागांमध्ये कमी दाबाने पाणी मिळण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी आधीच पुरेसा साठा करून ठेवावा, पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि दुरुस्ती कामात सहकार्य करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.






