ठाणेकरांनो लक्ष द्या! ‘या’ भागात पुढील 36 दिवस नो एन्ट्री; वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल

On: February 22, 2026 2:44 PM
Thane Traffic Update
---Advertisement---

Thane Traffic Update | ठाणे शहरातील वाहनचालकांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील माजिवडा आणि कापूरबावडी परिसरात पुढील 36 दिवसांसाठी काही मार्गांवर ‘नो एन्ट्री’ लागू करण्यात आली आहे. ठाणे वाहतूक पोलिसांनी नव्या अधिसूचनेद्वारे या बदलांची घोषणा केली असून नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अमृत 2.0 पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे कॅडबरी जंक्शन ते हरदास नगर दरम्यानच्या सेवा रस्त्यावर खोदकाम होणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 23 फेब्रुवारी 2026 ते 31 मार्च 2026 या कालावधीत काही मार्ग तात्पुरते बंद राहणार आहेत.

का करण्यात आले आहेत वाहतूक बदल? :

ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत वितरण व्यवस्थेचे बळकटीकरण आणि विस्ताराचे काम सुरू आहे. रवी स्टील नाका ते माजिवडा मेट्रो स्टेशन (हरदास नगर) या दरम्यान सेवा रस्त्याच्या मध्यभागी जलवाहिनी टाकली जाणार आहे. हे काम ज्यूपिटर हॉस्पिटल मार्गे कॅडबरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर होणार असल्याने वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल आवश्यक ठरले आहेत.

ठाणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त पंकज शिरसाट यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, नागरिकांनी नियमांचे पालन करून वाहतूक कोंडी टाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Thane Traffic Update | कोणते मार्ग राहणार बंद? पर्यायी मार्ग कोणते? :

कॅडबरी जंक्शनकडून हरदास नगरकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावर काही ठिकाणी प्रवेशबंदी लागू राहील. उत्सव हॉटेल, विवियाना मॉल आणि ज्यूपिटर हॉस्पिटल समोरील सेवा रस्त्याने रवी वजन काटा (पोखरण रोड नं. 2) कडे जाणाऱ्या वाहनांना हरदास नगर कट येथे प्रवेश बंद असेल. पर्यायी मार्ग म्हणून वाहनधारकांनी हरदास नगर कट येथून डावीकडे वळून वसंत लॉन्स सोसायटीसमोरील रस्ता वापरावा. काही वाहने ज्यूपिटर कट येथून उजवीकडे वळून स्लिप रोडमार्गे पुढे जाऊ शकतील.

तसेच लोढा कासा मल्टिमा सोसायटी, टीसीएस कंपनी आणि वसंत लॉन्स परिसरातून रवी वजन काटाकडे जाणाऱ्या वाहनांनाही हरदास नगर कट येथून डावीकडे वळण्यास मनाई असेल. या वाहनांनी हरदास नगर कट येथून उजवीकडे वळून ज्यूपिटर हॉस्पिटल समोरील सेवा रस्त्याचा वापर करावा.

ही अधिसूचना 23 फेब्रुवारीपासून लागू होऊन 31 मार्च 2026 पर्यंत अमलात राहणार आहे. मात्र पोलीस वाहने, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडॉर आणि अत्यावश्यक सेवांतील वाहनांना या नियमांतून सवलत देण्यात आली आहे. ठाणेकरांनी प्रवासाचे नियोजन करताना या बदलांची नोंद घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.

News Title: Thane Traffic Update: 36-Day No Entry Near Majiwada and Kapurbawdi, Check Alternate Routes

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now