BMC Election | मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंनी एकत्र येत मुंबईसाठी महत्त्वाकांक्षी जाहीरनामा जाहीर केला आहे. शिवसेना आणि मनसे युतीकडून सादर करण्यात आलेल्या या जाहीरनाम्यात मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. दादरमधील शिवसेना भवन येथे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.
मुंबईकरांचा स्वाभिमान केंद्रस्थानी ठेवून हा जाहीरनामा तयार करण्यात आल्याचा दावा ठाकरे बंधूंनी केला आहे. निवडणुकीपुरत्या घोषणा न करता सत्तेत आल्यानंतर या योजना प्रत्यक्षात राबवण्यात येतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. महिलांपासून तरुणांपर्यंत, शिक्षण, करप्रणाली, वाहतूक, पर्यावरण आणि रोजगार अशा विविध मुद्द्यांवर या जाहीरनाम्यात भर देण्यात आला आहे.
महिलांसाठी स्वाभिमान निधी, घरांवरील करात मोठा दिलासा :
लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंनी मुंबईतील घरकाम करणाऱ्या महिलांसाठी दरमहा 1500 रुपयांचा (Rs 1500 for Women) ‘स्वाभिमान निधी’ देण्याची घोषणा केली आहे. ही योजना निवडणुकीसाठी नव्हे, तर सत्तेत आल्यानंतर कायमस्वरूपी लागू केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. यासोबतच कोळी महिलांसाठी ‘माँ साहेब किचन’च्या माध्यमातून 10 रुपयांत जेवण उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
मुंबईकरांवरील कराचा बोजा हलका करण्यासाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. सध्या 500 स्क्वेअर फूटपर्यंतच्या घरांना मालमत्ता करात सूट देण्यात येते. मात्र, युती सत्तेत आल्यास 700 स्क्वेअर फूटपर्यंतच्या घरांना संपूर्ण प्रॉपर्टी टॅक्स माफ करण्यात येईल, असे आदित्य ठाकरेंनी जाहीर केले.
BMC Election | तरुण, शिक्षण, वाहतूक आणि पर्यावरणावर विशेष भर :
मुंबईतील बेरोजगारी कमी करण्यासाठी स्वयंरोजगाराला चालना देण्याचा निर्धार जाहीरनाम्यात करण्यात आला आहे. शहरातील एक लाख तरुण-तरुणींना 25 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंतचा रोजगार सहाय्यता निधी देण्यात येणार आहे. तसेच पालिकेच्या शाळांमध्ये दहावीनंतर ज्युनिअर कॉलेज सुरू करण्यात येणार असून सर्व बोर्डाच्या शाळा सुरू केल्या जातील, त्यात मराठी भाषा अनिवार्य असेल.
वाहतूक आणि पार्किंगच्या समस्येवरही तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. बीएमसीच्या मालकीच्या पार्किंग जागा मोफत करण्यात येणार असून प्रत्येक फ्लॅटला एक पार्किंगची अट लागू केली जाईल. बेस्ट बसच्या तिकीट दरात कपात करून फ्लॅट रेट लागू करण्याची घोषणाही करण्यात आली आहे. (Thackeray Manifesto Mumbai)
मुंबईकरांना मोकळा श्वास घेता यावा यासाठी क्लायमेट अॅक्शन प्लॅन राबवण्यात येणार आहे. फुटपाथ, मोकळ्या जागा, मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, पाळणाघर, आंतरराष्ट्रीय दर्जाची शौचालये आणि आणखी एक कॅन्सर रुग्णालय सुरू करण्याचा निर्धार अमित ठाकरेंनी व्यक्त केला. बीपीटीची 1800 एकर जमीन मुंबईसाठी मिळवण्यासाठी न्यायालयीन लढाही लढण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.






