MHADA Lottery 2026 | नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच घर खरेदीची वाट पाहणाऱ्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्यासारख्या महागड्या शहरांमध्ये स्वतःचं घर घेणं सर्वसामान्यांसाठी अवघड ठरत असताना, म्हाडाकडून 2026 मध्ये स्वस्त दरात घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. त्यामुळे हजारो कुटुंबांचे घराचं स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
घरांच्या वाढत्या किमतींमुळे महानगरांमध्ये घर खरेदी करणे अनेकांसाठी अशक्य झाले आहे. अशा परिस्थितीत म्हाडाच्या घरांना मोठी मागणी असते. म्हाडाच्या विविध मंडळांकडून अल्प उत्पन्न, मध्यम उत्पन्न आणि उच्च उत्पन्न गटासाठी घरे उपलब्ध करून दिली जातात. ही घरे लॉटरी पद्धतीने किंवा प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य यानुसार विक्रीसाठी दिली जातात.
नव्या वर्षात कुठे-कुठे निघणार लॉटरी? :
2026 मध्ये म्हाडाच्या मुंबई मंडळ, कोकण मंडळ आणि पुणे मंडळाकडून घरांच्या विक्रीसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. यामध्ये मुंबई शहरासह ठाणे आणि पुणे परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. या लॉटरीमुळे महानगरांमध्ये स्वतःचं हक्काचं घर घेण्याचं अनेकांचं स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे. (Affordable Homes Mumbai)
सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असल्याने आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे सध्या लॉटरी प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. मात्र, निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुंबई, कोकण आणि पुणे मंडळाकडून घरांच्या विक्रीसाठी लॉटरी जाहीर केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
MHADA Lottery 2026 | मुंबई-ठाण्यात लाखो घरांचे नियोजन :
म्हाडाने 2030 पर्यंत राज्यभर मोठ्या प्रमाणात घरबांधणीचे नियोजन केले आहे. एमएमआर ग्रोथ हब अंतर्गत सुमारे 8 लाख घरांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये कोकण मंडळाकडून जवळपास 2,000 घरांची लॉटरी काढण्याचे नियोजन असल्याची माहिती आहे. मुंबई मंडळातील लॉटरीत नेमकी किती घरे असतील, याबाबत अद्याप अधिकृत आकडेवारी जाहीर झालेली नाही. (Buy Home at Low Price)
दरम्यान, मुंबईत विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पुनर्विकास प्रकल्प सुरू आहेत. बीडीडी चाळ, मोतीलाल नगर, पत्राचाळ, अभ्युदयनगर, जोगेश्वरीतील पूनम नगर, अंधेरीतील सरदार वल्लभभाई पटेल नगर, वरळीतील आदर्श नगर आणि वांद्रे रिक्लेमेशनसारख्या प्रकल्पांमुळे मुंबईत सुमारे 6 लाख नवी घरे उपलब्ध होणार आहेत. यामुळे येत्या काळात सर्वसामान्यांसाठी घर खरेदीची संधी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.






