Ahilyanagar News | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) रविवारी (5 ऑक्टोबर) शिर्डी (Shirdi) दौऱ्यावर आले. मात्र, त्यांच्या दौऱ्याआधीच नगर स्थानिक गुन्हे शाखेने शिवसेना (ठाकरे गट) चे माजी शहरप्रमुख भरत मोरे, मनसेचे ) तालुकाप्रमुख अनिल गायकवाड आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या घटनेवरून शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत यांनी अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
अमित शहांवर जोरदार टीका
संजय राऊत म्हणाले, “देशाचे निधड्या छातीचे गृहमंत्री, काश्मीरमधून कलम 370 हटवणारे, शिवसेनेशी मुंबईत दोन हात करणारे, निवडणूक आयोगाच्या (Election Commission) मदतीने शिवसेने सारखा पक्ष फोडणारे आणि सोनम वांगचूकला अटक करणारे अमित शाह नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. तुम्ही येण्याआधीच राजकीय कार्यकर्त्यांना अटक करता, त्यांना आंदोलन करू नका, काळे झेंडे दाखवू नका म्हणून ताब्यात घेता. नगरमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांना अज्ञातस्थळी नेण्यात आले आणि आता त्यांना तोफखाना पोलिस ठाण्यात बसवले आहे. मनसेचे आणि मराठा समाजातील कार्यकर्त्यांनाही नोटीस बजावली गेली, काहींना अटकही झाली. अखेर तुम्हाला एवढी भीती कसली वाटते?”
राऊत पुढे म्हणाले, “तुम्हाला लडाखमध्ये सोनम वांगचूकची भीती वाटते, मणिपूरमधल्या महिलांची भीती वाटते, आणि महाराष्ट्रात शिवसैनिकांची भीती वाटते. देशावर राज्य करत असूनही तुम्ही इतके भयभीत का आहात? मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासही तुम्ही गेले नाहीत, हीसुद्धा तुमची भीतीच आहे. अशा भयग्रस्त सत्ताधाऱ्यांना देशावर राज्य करण्याचा अधिकार नाही. जे लोकशाहीतील आंदोलनांनाच घाबरतात, त्यांना राज्य करण्याचा अधिकार कसा?
“गुजरात मॉडेल सरकारला लोकांचे आंदोलन नको आहे”
ते म्हणाले, “लोकशाहीने आम्हाला मंत्र्यांना जाब विचारण्याचा, गाड्या अडवण्याचा अधिकार दिला आहे. मुंबईत शिवसैनिकांनी मोरारजी देसाई (Moraraji Desai) यांच्या गाडीसमोर आंदोलन केले होते, यशवंतराव चव्हाण (Yashawantrao Chavan) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्या गाड्यांसमोरही आंदोलने झाली आहेत. हे लोकशाहीत होतं. पण या ‘गुजरात मॉडेल’ सरकारला लोकांचे आंदोलन नको आहे, कारण त्यांना लोकांची भीती वाटते.”
शेवटी राऊत म्हणाले, “तुम्ही सामान्य शिवसैनिकांना अटक करता, त्यांनी आंदोलनाची घोषणा देखील केलेली नसते. ते फक्त आपलं काम करत असतात आणि पोलिस येऊन त्यांना उचलून नेतात. हा महाराष्ट्र आहे की भीतीचं राज्य? तुम्ही गृहमंत्री आहात, पण तसं वागा. हा पळकुटेपणा कशासाठी? फडणवीस आणि अमित शाह दोघेही विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करून, त्यांना तुरुंगात टाकून राज्य चालवत आहेत. पण हे जास्त काळ चालणार नाही.”






