Tejasvee Ghosalkar Resign | मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेसाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. तेजस्वी अभिषेक घोसाळकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला असून त्या आज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर करत त्यांनी हा निर्णय का घ्यावा लागला, यामागील कारणे स्पष्ट केली आहेत.
तेजस्वी घोसाळकर यांनी आपल्या पोस्टमध्ये हा निर्णय वेदनेतून घेतल्याचं नमूद केलं आहे. हा निर्णय कोणत्याही महत्त्वाकांक्षेमुळे नाही, तर आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आणि जबाबदाऱ्यांच्या ओझ्यामुळे घ्यावा लागत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. “प्रामाणिकतेशी कोणतीही तडजोड नाही,” असं स्पष्ट करत त्यांनी शिवसैनिकांप्रती कृतज्ञताही व्यक्त केली आहे.
भावूक पोस्टमध्ये आयुष्यातील संघर्ष मांडला :
तेजस्वी घोसाळकर यांनी पोस्टमध्ये सांगितलं की, त्या एका सामान्य कुटुंबातून येतात आणि घोसाळकर कुटुंबात सून म्हणून आल्यानंतर समाजकारण आणि राजकारणात सक्रिय झाल्या. पती अभिषेक घोसाळकर (Abhishekh Ghosalkar) आणि सासरे विनोद घोसाळकर यांना साथ देण्यासाठी त्यांनी हा प्रवास स्वीकारला. जनतेच्या कामात राहणं आणि त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणं, यातच त्यांना समाधान मिळत गेलं.
मात्र अभिषेक घोसाळकर यांच्या निर्घृण हत्येनंतर त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. दोन लहान मुलांची जबाबदारी, वैयक्तिक दुःख आणि जनतेकडून असलेली अपेक्षा या सगळ्यांचा सामना करताना अनेकदा आपण कोसळल्याचं, पण शिवसैनिकांच्या पाठिंब्यामुळे पुन्हा उभं राहिल्याचं त्यांनी नमूद केलं.
Tejasvee Ghosalkar Resign | वेगळा निर्णय घ्यावा लागतोय, पण ऋण विसरणार नाही :
सध्याच्या राजकीय परिस्थितीत जनतेसाठी काम करताना आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं तेजस्वी घोसाळकर यांनी म्हटलं आहे. “मला केवळ पदाची नाही, तर मनापासून साथ देणाऱ्या ताकदीची गरज आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं. प्रभाग क्रमांक 1 मधील प्रश्न असोत किंवा मुलांचं भविष्य सुरक्षित करण्याचा विषय, त्यासाठी वेगळा निर्णय घ्यावा लागत असल्याचं त्यांनी सांगितलं.
आपल्या आयुष्यातील अंधाऱ्या काळात शिवसैनिकांनी दिलेली साथ आपण कधीही विसरणार नसल्याचं त्यांनी ठामपणे नमूद केलं आहे. “मी कायम तुमच्या ऋणात राहीन,” असे भावनिक शब्द त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहेत.
शिवसेनेचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेशाची तयारी :
तेजस्वी घोसाळकर (Tejasvee Ghosalkar Resign) यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी शिवसेनेच्या सदस्यत्वाचा अधिकृत राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. हा निर्णय वेदनेतून घेतला असला तरी जनतेशी असलेली प्रामाणिकता आणि विश्वास कायम राहील, असं त्यांनी स्पष्ट केलं. जात, धर्म, पक्ष न पाहता समाजासाठी काम करत राहणार असल्याचं आश्वासनही त्यांनी दिलं आहे.
आज त्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती असून, या निर्णयामुळे मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






