Sushma Andhare on Prakash Shinde | शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाऊ प्रकाश शिंदे यांच्यावर 145 कोटी रुपयांच्या ड्रग्स प्रकरणाशी संबंधित गंभीर आरोप केले आहेत. जावळी तालुक्यातील सावरीत गावात असलेल्या एका रिसॉर्टवर टाकलेल्या धाडीत मोठ्या प्रमाणात ड्रग्स सापडल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणात साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी माहिती दडपल्याचा आरोपही सुषमा अंधारे यांनी केला आहे.
या आरोपांनंतर प्रकाश शिंदे यांनी माध्यमांसमोर येत सर्व आरोप फेटाळून लावले होते. संबंधित हॉटेल किंवा रिसॉर्ट आपण चालवत नसून ते दुसऱ्याला चालवायला दिल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले होते. मात्र, आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुषमा अंधारेंनी थेट मोबाईलवरून पुरावे दाखवत प्रकाश शिंदे यांच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
“आता सातबारा बदलण्याच्या हालचाली सुरू” – सुषमा अंधारे :
पत्रकार परिषदेत बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, काल प्रकाश शिंदे यांनी दिलेले स्पष्टीकरण सतत बदलत आहे. आधी ते म्हणाले की हे हॉटेल त्यांचे नाही, मग तेच प्रकाश शिंदे (Prakash shinde) असल्याचे मान्य केले आणि आता जागा दुसऱ्याला वापरायला दिल्याचे सांगितले जात आहे. ही भूमिका सतत बदलण्याची पद्धत संशयास्पद असल्याचे अंधारेंनी म्हटले. (Sushma Andhare on Prakash Shinde)
यावेळी त्यांनी आपल्या मोबाईलवरून थेट प्रात्यक्षिक दाखवत ‘हॉटेल तेजयश’ बाबत माहिती सादर केली. गुगल सर्चमध्ये हॉटेलचे नाव टाकल्यानंतर 4.8 रेटिंग, ऑनलाईन बुकिंग सुविधा, लोकेशन मॅप आणि संपर्क क्रमांक उपलब्ध असल्याचे त्यांनी दाखवले. त्या नंबरवर क्लिक केल्यानंतर व्हॉट्सॲपमध्ये ‘प्रकाश शिंदे’ असे नाव दिसत असल्याचा दावा त्यांनी केला. यावरून हे हॉटेल आजही प्रकाश शिंदेच चालवत असल्याचा आरोप सुषमा अंधारेंनी केला आहे.
Sushma Andhare on Prakash Shinde | ड्रग्स, पर्यटनस्थळ आणि प्रशासनावर गंभीर सवाल :
सुषमा अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या की, महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेच्या विश्वासाचा हा विषय आहे. ड्रग्समधून कमावलेला पैसा निवडणुकांमध्ये वापरला जात असेल, तर लोकशाहीसाठी ते अत्यंत घातक असल्याचा टोला त्यांनी लगावला. पाचगणीसारख्या महत्त्वाच्या पर्यटनस्थळी ड्रग्स आणि कोकेनचा विळखा असेल, तर हे राज्यासाठी गंभीर संकट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Prakash shinde Drug Case)
यावेळी त्यांनी साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावरही प्रश्न उपस्थित केले. इतक्या मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरू असताना प्रशासन आणि पालकमंत्र्यांना याची माहिती कशी नव्हती, असा सवाल त्यांनी केला. पाचगणी हे ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखले जाणारे पर्यटनस्थळ असून त्याच्या सुरक्षेची जबाबदारी पालकमंत्र्यांची असल्याचेही अंधारेंनी ठणकावून सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी :
या संपूर्ण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. वाल्मिक कराड प्रकरणात मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात आला, तर इथे प्रकाश शिंदे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाऊ आहेत, असे त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री पदावर राहून तपासावर प्रभाव पडू शकतो, अशी शक्यता असेल तर नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.






