Supriya Sule | अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर निर्माण झालेल्या शंका-कुशंकांवर आता राजकीय स्तरावरूनही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या दुर्घटनेनंतर घातपाताची शक्यता व्यक्त केली जात असून विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी पहिल्यांदाच स्पष्ट भूमिका मांडत सखोल आणि पारदर्शक चौकशीची मागणी केली आहे. (Supriya Sule Statement)
ब्लॅक बॉक्सवर प्रश्नचिन्ह उपस्थित :
28 जानेवारी रोजी विमान कोसळून अजित पवारांसह त्यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर हा अपघात की घातपात, याबाबत चर्चा सुरू झाली. आमदार रोहित पवार यांनी गेल्या आठवड्यात दोन वेळा आणि 18 फेब्रुवारी रोजी पुन्हा पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी VSR कंपनीबाबत गंभीर आरोप करत संबंधित कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा केला. दुर्घटनेला 20 दिवस उलटूनही तपासात अपेक्षित वेग नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. (Rohit Pawar Press Conference)
दरम्यान, ब्लॅक बॉक्स नुकसानग्रस्त झाल्याची माहिती समोर आल्यानंतर अजित पवार यांचे पुत्र जय पवार (Jay Pawar) यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया नोंदवली. विमान अपघातात ब्लॅक बॉक्स सहज नष्ट होऊ शकत नाही, असे नमूद करत त्यांनी या प्रकरणातील संपूर्ण सत्य जनतेसमोर यावे, अशी मागणी केली. तसेच VSR कंपनीला उड्डाण परवानगी देऊ नये, अशी ठोस मागणीही त्यांनी केली.
Supriya Sule | सुप्रिया सुळे यांची भूमिका :
या सर्व घडामोडींनंतर शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी X वर सविस्तर पोस्ट करत भूमिका स्पष्ट केली. अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून समाजमाध्यमांवर विविध शंका व्यक्त होत असल्याचे त्यांनी नमूद केले. आमदार रोहित पवार अभ्यासपूर्ण पद्धतीने काही तथ्ये आणि मुद्दे मांडत असल्याचे सांगत, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळालीच पाहिजेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
आदरणीय अजितदादा यांच्या अपघाती मृत्यूनंतर संबंध महाराष्ट्राला धक्का बसलेला आहे. समाजमाध्यमांतून अनेक शंका-कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. जनभावना अतिशय तीव्र असून लोक अजूनही शोकाकूल अवस्थेत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार (@RRPSpeaks) हे अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने काही…
— Supriya Sule (@supriya_sule) February 19, 2026
यंत्रणेकडून उत्तर देण्यात विलंब झाल्यास लोकांमधील अस्वस्थता वाढू शकते, त्यामुळे या घटनेचे सत्य पारदर्शक पद्धतीने उघड व्हावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच लोकप्रतिनिधी म्हणून प्रश्न विचारणे हा घटनादत्त अधिकार असल्याचे नमूद करत रोहित पवार यांना कडेकोट सुरक्षा देण्याची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनीही आपल्या कुटुंबीयांना त्यांच्या सुरक्षेबाबत चिंता असल्याचे सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांची ही मागणी महत्त्वाची मानली जात आहे.






