Somnath Suryawanshi Death Case | परभणी न्यायालयीन कोठडीत मृत्यूमुखी पडलेल्या सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryawanshi) प्रकरणात सरकारला मोठा धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा आदेश कायम ठेवत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांवर लवकरच कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Somnath Suryawanshi Death Case)
कोठडीत मृत्यू, आंदोलनाची पार्श्वभूमी :
१० डिसेंबर २०२४ रोजी परभणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संविधान प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर राज्यभर आंबेडकरी संघटनांनी तीव्र प्रतिक्रिया दिली होती. या पार्श्वभूमीवर परभणीत बंद पुकारण्यात आला होता, ज्याला हिंसक वळण लागले. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज, अश्रुधूर आणि अटकसत्र सुरू केले. त्याच दरम्यान लातूरचा मूळ रहिवासी आणि पुण्यात कायद्याचे शिक्षण घेणारा सोमनाथ सूर्यवंशी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि न्यायालयीन कोठडीत पाठवले. मात्र अवघ्या दोन दिवसांत त्याचा मृत्यू झाला.
सोमनाथच्या आई विजयबाई वेंकट सूर्यवंशी यांनी या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Aambedkar) यांनी सोमनाथची बाजू घेऊन न्यायालयात ठोस पवित्रा मांडला होता. परिणामी, हायकोर्टाने पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. मात्र, पोलीस विभागाने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
Somnath Suryawanshi Death Case | सुप्रीम कोर्टाचा निर्णायक झटका :
आज सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर अंतिम सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवत पोलिसांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे आता आरोपी पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होणे निश्चित मानले जात आहे. (Somnath Suryawanshi Death Case)
प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या अधिकृत ट्वीटमध्ये यासंदर्भात माहिती देताना म्हटले की, “सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हे सत्यासाठी चाललेल्या लढ्याचं यश आहे. आता आरोपी पोलिसांवर गुन्हे दाखल व्हावेत आणि कठोर कारवाई व्हावी, हीच आमची मागणी आहे.”






